

सांगलीवाडी : आता राजकारण म्हणजे बऱ्याचवेळा समाजसेवेपेक्षा मिरविण्याचे जणू क्षेत्रच बनले आहे. मात्र कधी कधी राजकारण, पद आणि योजनेच्या पलीकडेही काहीतरी असतं, ते म्हणजे माणुसकी. मात्र यासाठी मन संवेदनशील असावे लागते आणि संवेदनशील मनाचे अनेकजण अशी माणुसकी जपतात देखील!
याचाच प्रत्यय आणून देणारी एक घटना नुकतीच सांगलीत घडली. एका 10 वर्षांच्या चिमुकलीच्या हृदयावर झालेल्या गंभीर आजारावर तातडीने उपचार करून तिचे जीवन वाचविले. मात्र या जीवनसंघर्षाच्या प्रवासात अनेक संवेदनशील लोकांनी आपापली जबाबदारी मनापासून पार पाडली. ही लहान मुलगी कोलकात्यातील मजूर कुटुंबातील असून सध्या सांगलीतील शिकते. तिच्या शाळेतील शिक्षिका चित्रा महापुरे यांनी याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, या मुलीच्या हृदयात 22 मि.मी.चे छिद्र असल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच त्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. परंतु तिचे रेशनकार्ड कोलकात्याचे असल्यामुळे सरकारी मदत मिळण्यात मोठी अडचण येत होती. ही बाब समजताच सांगलीवाडीतील युवा नेते अभिजित कोळी यांनी पुढाकार घेतला.
अभिजित कोळी यांनी यासाठी पाठपुरावा सुरू केला. प्रथमत: कोलकात्यातील संबंधित आयपीएस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फक्त दोन दिवसांत रेशनकार्डचे सरेंन्डर सर्टिफिकेट मिळवले. तसेच नंतर सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही स्थिती आपत्कालीन असल्याचे समजावले आणि नव्या रेशनकार्डची प्रक्रिया केवळ दोन दिवसांत पूर्ण करून घेतली. यानंतर लगेचच या मुलीला भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सचिन गावडे, डॉ. रियाझ मुजावर, डॉ. पृथ्वीराज पाटील, डॉ. प्रतीक यादव आणि उमर गवंडी यांनी समन्वयाने काम करत या चिमुकलीची शस्त्रक्रिया पूर्ण केली. या साऱ्या कठीण काळात रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी वर्गानेही अतिशय मनापासून सहकार्य दिले. यातून ही चिमुकली पूर्णपणे आजारमुक्त झाली. आज ही लहान मुलगी पुन्हा हसते आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य, आनंदाश्रू आणि तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील कृतज्ञता हेच या सर्व प्रयत्नांचे खऱ्याअर्थाने यश आहे.
ही घटना केवळ एका कुटुंबासाठी नव्हे, तर समाजासाठीही प्रेरणादायी आहे. जेव्हा माणूस म्हणून एकत्र येतो, तेव्हा प्रत्येक अडचण सोपी होते आणि एक छोटा प्रयत्न एखाद्याचे आयुष्य बदलू शकतो. खरे नेतृत्व करणे म्हणजे निव्वळ मते मिळवणे नव्हे, तर समोरच्यांची मने जिंकणे हे होय आणि ते अभिजित कोळी यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे. अभिजित कोळी यांच्या संवेदनशीलतेने केलेल्या कामाचे भागात कौतुक होत आहे.