Jaldut Railway : जलदूत रेल्वेची आज दशकपूर्ती : तहानलेल्या लातूरसाठी मिरजने लिहिला माणुसकीचा इतिहास file photo
लातूर

Jaldut Railway : जलदूत रेल्वेची आज दशकपूर्ती : तहानलेल्या लातूरसाठी मिरजने लिहिला माणुसकीचा इतिहास

कृतज्ञतेचा ओलावा कायम, अशक्य वाटणारी बाब परस्परांच्या सहकार्यामुळे नेली सिद्धीस

पुढारी वृत्तसेवा

Decade completion of Jaldut Railway today: Miraj wrote history of humanity for thirsty Latur

शहाजी पवार

लातूर: लातूर जिल्ह्यातील अनेक गावांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. लातूर शहरालाही उन्हाळ्यातील पिण्याच्या नवा नाही, मात्र २०१६ चा भीषण दुष्काळ आठवला की आजही लातूरकरांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्या संकटसमयी सांगली जिल्ह्यातील मिरजकरांनी रेल्वेमार्फत पाणी पाठवून लातूरकरांची तहान भागवली होती. त्या माणुसकीची आठवण झाली की आजही लातूरकरांचे डोळे कृतज्ञतेने पाणावतात आणि हात नकळत नमस्कारासाठी जोडले जातात.

कोरड्या पडलेल्या विहिरी, तळ गाठलेली धरणे, रिकामे नळ आणि पाण्याच्या टँकरमागे लागलेल्या लांबच लांब रांगा हेच चित्र २०१६ च्या उन्हाळ्यात लातूर शहरासह जिल्हाभर दिसत होते. प्रत्येक दिवस जगण्याची नवी परीक्षा घेऊन उगवत होता आणि धास्ती मनात ठेवून मावळत होता. पाण्याचा झाला होता. पाण्यासाठी अनेक ठिकाणी जलस्रोतांवर जमावबंदी लागू करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. अशा वेळी लातूरच्या दिशेने धावून आली एक रेल्वे. ती प्रवाशांची नव्हती तर जीवनदायी पाण्याची होती. तिचे नाव होते 'जलदूत वॉटर एक्सप्रेस'.

या रेल्वेनेच हजारो लातूरकरांच्या घशाची कोरड दूर केली. आज ८ ऑगस्ट २०२६ रोजी या ऐतिहासिक उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. दशक उलटले असले तरी त्या रेल्वेची शिट्टी, लातूर स्थानकावरील उत्सुकतेचे वातावरण, पाण्याने भरलेले टँकर आणि प्रत्येक थेंबाचे असलेले अमूल्य महत्त्व आजही लातूरकरांच्या मनात जिवंत आहे. ११ एप्रिल २०१६ रोजी मिरज येथून जलदूतची पहिली चाचणी फेरी लातूरकडे रवाना झाली. सुरुवातीला दहा वॅगनमधून पाच लाख लिटर पाणी लातूरला पोहोचले.

त्यानंतर पाण्याची गरज वाढत गेली आणि ५० वॅगनच्या रेल्वेमधून तब्बल २५ लाख लिटर पाणी प्रत्येक फेरीत आणले जाऊ लागले. लातूर रेल्वेस्थानकानजीक असलेल्या एका शेतकऱ्यांच्या विहिरीत हे पाणी उतरवून महानगरपालिकेमार्फत शहराच्या कानाकोपऱ्यात ते पोहोचवले जात होते. यामुळे अनेक घरांमध्ये पुन्हा नळातून पाणी आले आणि निराशेच्या वातावरणात आशेचा किरण दिसू लागला. मिरजकरांनी स्वतःच्या गरजा सांभाळत लातूरसाठी पाण्याचे दरवाजे खुले केले. त्यामुळे जलदूत ही केवळ रेल्वे राहिली नाही तर दोन शहरांना जोडणारा माणुसकीचा सेतू ठरली.

मिरज ते लातूरचा ३४२ किलोमीटरचा हा प्रवास केवळ रेल्वेचा नव्हता; तो आशेचा, माणुसकीचा आणि सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठच होता. ऑगस्ट २०१६ मध्ये पावसाने हजेरी लावली आणि लातूरचे जलसाठे भरू लागले. ९ ऑगस्ट २०१६ रोजी जलदूतची १११ वी आणि अंतिम फेरी पूर्ण झाली. या संपूर्ण मोहिमेत मिरजहून लातूरला सुमारे २८ कोटी १५ लाख लिटर पिण्याचे पाणी पुरविण्यात आले. दुष्काळाचे संकट हळूहळू दूर झाले मात्र जलदूतची आठवण लातूरच्या इतिहासात कायमची कोरली गेली.

केंद्र, राज्य सरकारचे सहकार्य

आज दहा वर्षांनंतर हे सारे आठवताना जलदूत वॉटर एक्सप्रेस ही केवळ पाणीटंचाई निवारण उपाययोजना होती, असे वाटत नाही तर ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयक्षमतेची, तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे व जिल्हाधिकारी पाडुरंग पोले यांच्या तत्परतेची, भारतीय रेल्वेच्या कार्यक्षमतेची, मिरजकरांच्या माणुसकीची अन् लातूरकरांच्या संघर्षाची जिवंत साक्षही वाटते. भविष्यातील जल नियोजन, जलसंधारण आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व अधोरेखित करणारा तो इतिहासही ठरतो. भलेही जलदूतची शिट्टी आज ऐकू येत नाही; पण तिने अप्रत्यक्षपणे दिलेला पाणी वाचवाचा संदेश सर्वांनी निष्ठेने अंगीकारायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या संमतीनंतरच जलदूत रेल्वे धावू लागली. या प्रयोगाचा उल्लेख पंतप्रधानांनी तेव्हा केलेल्या इंडोनेशिया दौऱ्यातही केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT