

Doctors' strike; Healthcare collapsed
लातूर, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रात होमिओपॅथी (बीएचएमएस) डॉक्टरांना सीसीएमपी अभ्यासक्रमाद्वारे अॅलोपॅथी औषधे देण्याची व महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीची परवानगी देण्याच्या शासन निर्णयाविरोधात ४ ऑगस्टपासून अॅलोपॅथिक डॉक्टरांनी पुकारलेल्या संपात गुरुवारी निवासी डॉक्टरही सहभागी झाल्याने बाह्यरुग्ण सेवा विस्कळीत झाली.
विशेष म्हणजे खासगी रुग्णालयातील अत्याश्यक सेवाही बंद ठेवण्यात आल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची धास्ती वाढली. लातूर आयएमएच्या वतीने लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करून शासनाने तो निर्णय मागे घ्यावा अशी एकमुखी मागणी डॉक्टरांनी केली.
चार व पाच ऑगस्ट असा सलग २४ तासांचा बंद लातूर जिल्ह्यात आयएमएने पाळला. सहा ऑगस्ट रोजी बाह्यरुग्णसेवेबरोबर अत्यावश्यक सेवा,शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या. अनेक रुग्णालयांची प्रवेशद्वारे बंद असल्याने रुग्णांना आल्या पावली परत फिरावे लागले. विशेष म्हणजे गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनीही काम बंद आंदोलन केले. त्यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत तो निर्णय मागे घ्यावा अशी एकमुखी मागणी केली.
या निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला लातूर आयएमएने पाठिंबा दिला. लातूर आयएमएने गुरुवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली. त्यांनतर तेथून औसा रोड राजीव गांधी चौक, महात्मा गांधी चौक अशी मोटारसायकल रॅली काढून रुग्णालये बंद ठेवण्याचे आवाहन केले. सायंकाळी सर्व डॉक्टरांनी येथील डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात बैठक घेतली. आएएमए महाराष्ट्र जो आदेश देईल त्याप्रमाणे पुढील दिशा ठरवली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.