Manjara Dam–Latur pipeline : मांजरा धरण ते लातूर जलवाहिनीवरील पाणीचोरीला चाप file photo
लातूर

Manjara Dam–Latur pipeline : मांजरा धरण ते लातूर जलवाहिनीवरील पाणीचोरीला चाप

२८ अवैध जोडण्या तोडल्या, पाईपही जप्त, महिनाभरातील तिसरी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Crackdown on water theft from the Manjara Dam–Latur pipeline

लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मांजरा धरण ते हरंगूळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या मुख्य जलवाहिनीवरील पाणीचोरी रोखण्याची मोहीम प्रशासनाने तीव्र केली आहे. रविवारी (दि. २५) राबविण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल २८ अनधिकृत नळजोडण्या तोडण्यात आल्या. तसेच विनापरवाना पाणी उपसण्यासाठी वापरण्यात येणारे पाइपही जप्त करण्यात आले. महिनाभरातील ही तिसरी मोठी कारवाई आहे.

मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत जोडण्या यापूर्वी दोन वेळा तोडण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही काही ठिकाणी अनधिकृतपणे पाणी घेतले जात असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि महापालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी पुन्हा कारवाईचे निर्देश दिले.

त्यानुसार महापालिकेच्या विशेष शोध पथकाने महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही मोहीम राबविली. या कारवाईत तांदूळजा, रांजणी, घारगाव, ताडगाव आणि हिंगणगाव येथील अवैध जोडण्या खंडित करण्यात आल्या. त्यात तांदूळजा येथील एक, रांजणीतील पाच, घारगावमधील दहा, ताडगावमधील एक आणि हिंगणगावमधील अकरा जोडण्यांचा समावेश आहे.

विविध आकारांच्या पाइपद्वारे मुख्य जलवाहिनीतून विनापरवाना पाणी उपसले जात होते. तांदूळजा येथे कारवाईदरम्यान महापालिका आयुक्त राहुल कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी रोहिणी नन्हे-विरोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मेघना आय. एन., तहसीलदार सौदागर तांदळे, पोलीस उपनिरीक्षक अंधारे आणि उपायुक्त तथा पाणीपुरवठा विभागाचे समन्वयक डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT