

चाकूर : तालुक्यातील बेलगाव येथे वीज वितरण यंत्रणेतील बिघाडामुळे ऊस जळून खाक झाला असून, शेतकऱ्यांचे सुमारे साडेचार लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना रविवारी (दि. २५) दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बेलगाव येथील डीपीजवळ झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अशोकराव वाकळे पाटील यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला. तसेच या आगीत किशनराव वाकळे पाटील यांच्या शेतातील उसाचेही मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी वर्षभर अपार मेहनत आणि मोठी आर्थिक गुंतवणूक करून ऊसपीक जोपासले होते. मात्र, ऐन तोडणीच्या तोंडावर लागलेल्या आगीमुळे उभे पीक जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. ग्रामीण भागात अशा घटना वाढल्या असून, वीज यंत्रणेची नियमित तपासणी व देखभाल-दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करून आगीचे नेमके कारण शोधावे, नुकसानीचा पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परिसरातील डीपी, वीजखांब आणि सैल झालेल्या वीजतारांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.