Couple ends life near Latur
लातूर, पुढारी वृत्तसेवा : प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध झाल्याने एका नर्स आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या अपंग तरुणाने एकत्र आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. पेठ गावच्या शिवारात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नितीन संदीपान दराडे (वय २९) व राणी मालबा दराडे (२४) (दोघेही रा. दरडवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी लातूर ग्रामिण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू अशी नोंद घेण्यात आली आहे.
घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध झाल्याने एका नर्स आणि एमपीएससी परी क्षेची तयारी करणाऱ्या अपंग तरुणाने ऐन दिवाळीत गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटल्याने हळहळ व्यक्त होत आहे. लातूर नजीक असलेल्या पेठ शिवारातील पत्र्याच्या एका खोलीत एका बाजूला तरुणाने व नर्स तरुणीनेही गळफास घेत आयुष्य संपवले.
नितीन दराडे हा शारीरिकदृष्ट्या अपंग असून, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तो अहमदपूर येथे राहून एमपीएससीची तयारी करत होता. तर राणी दराडे ही नर्स असून, ती लातूर येथील खासगी रुग्णालयात कार्यरत होती. दोघेही भावकीतील असल्याने आधीपासून दोघांची ओळख होती. ओळ खीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र या प्रेमसंबंधांना दोन्ही कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. घरच्यांच्या या विरोधामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या या जोडप्याने टोकाचा निर्णय घेत आपली जीवनयात्रा संपवली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
दोघांचे मृतदेह लातूर जिल्ह्यातील पेठ गावच्या शिवारात सापडले. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी लातूर जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
आत्महत्येमुळे गावात खळबळ
या घटनेमुळे दरडवाडी गावासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. दोघेही शिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणारे तरुण होते. मात्र दोघांनीही असे पाऊल उचलल्याने गावात या घटनेची एकच चर्चा आहे. नितीनच्या अपंगत्वावर मात करून तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता, तर राणीने वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले होते. पण समाजातील दडपण आणि घरच्यांच्या विरोधामुळे त्यांनी घेतलेल्या या निर्णयाने गावकऱ्यांसह कुटुंबीय सुन्न झाले आहेत.