Cooperation Minister Patil orders to conduct a Panchnama of damage in Ahmedpur-Chakur taluka
अहमदपूर / चाकूर, पुढारी वृत्तसेवा : अहमदपूर व चाकूर तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री बाबासाहेव पाटील यांनी दोन्ही तालुक्यांतील स्थानिक प्रशासनाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेऊन पूर परिस्थितीतीचा आढाव घेऊन अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास दिले आहेत.
अहमदपूर व चाकूर तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा तसेच उपाययोजना संदर्भात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दूरदृश्य प्रणा-लीद्वारे आढावा घेतला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, घुगे उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, अहमदपूर तहसीलदार उज्ज्वला पांगरकर, तहसीलदार नरसिंग जाधव, अहमदपूर व तालुका कृषी अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पाटील म्हणाले अनेक गावांत नदी नाल्याचे पाणी घरात शिरल्यामुळे घरांची पडझड होऊन झालेल्या. नदीकाठच्या जमीन खरडून गेली आहे, त्याचे तत्काळ पंचनामे करावेत.
ज्या गावातील पुलावर पाणी जाऊन गावांचा संपर्क तुटला आहे तेथील नागरिकांना पुलावरून जाऊ नये, असे आवाहन करावे तसेच पुलांच्या दुरुस्तीबाबत प्रस्ताव सादर करावेत. अहमदपूर व चाकूर तालुक्यांतील पाझर तलाव, साठवण तलाव, सिंचन तलाव, पूर्ण क्षमतेने भरून जात आहेत. काही तलाव फुटले आहेत तसेच काही तलावातील पाणी सांडवा फोडून काढून देण्यात आले आहेत.
सदरील तलावांच्या दुरुस्तीचा, पडझड झालेल्या कोल्हापुरी बंधारे व सिमेंट नाला तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी जाऊन शाळेचे नुकसान झालेले आहे, अशा शाळांचे दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करावे व शाळेची इमारत धोकादायक असल्यास वर्ग इतरत्र भरवण्यात यावेत. गावा गावांना जोडणारे रस्ते पावसामुळे खचल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. त्या रस्ते दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करावा.
अनेक गावांतील घरामध्ये पाणी जाऊन नागरिकांचे नुकसान झाले आहे अशा नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था करावी. पोल पडल्यामुळे व तार तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे अशा गावांमध्ये तत्काळ विद्युत पुरवठा चालू करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
बंद असलेल्या बसेस चालू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी. नाल्या जेसीबीव्दारे खुल्या करून पाणी काढून देणे व नाल्या दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव सादर करणे. अहमदपूर व चाकूर शहरातील गटारी तुंबल्यामुळे पाणी शहरातील मुख्य रस्त्यांवर आले आहे. या गटारी जेसीबीव्दारे खुल्या करण्यात याव्यात. अतिवृष्टीमुळे रोगराई (डेंगू मलेरिया) पसरण्याची भीती आहे. तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात सर्व विभागाच्या एकत्रित नुकसानीचा मदत मिळणेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे तत्काळ सादर करावा, अशी सूचना केली.