Cooperation Minister Babasaheb Patil helped by paying off the loan of a farmer from Ahmedpur, Handoli taluka
अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा : आर्थिक विवंचनेत असलेल्या हाडोळती ता. अहमदपूर येथील अल्पभूधारक शेतकरी अंबादास गोविंद पवार यांना मदतीचा ओघ सुरूच असून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ५ जुलै रोजी त्यांच्या घरी भेट देऊन गावातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे ४२ हजार ५५० रूपये कर्ज फेडून बेबाकी प्रमाण पत्र दिले.
सहकार मंत्री व तालुक्याचे भूमिपुत्र असलेले बाबासाहेब पाटील हे पावसाळी अधिवेशनात व्यस्त असल्यामुळे भ्रमणध्वनीवर त्यांनी संपर्क साधून सोसायटीचे कर्ज फेडण्याचे, मुलांना शिक्षण व नोकरी देण्याचे आश्वासन देत गावाकडे आल्यावर भेटतो असे सांगितले होते.
बोलल्या प्रमाणे त्यांनी अंबादास पवार व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचीशी चर्चा केली. आ. विक्रम काळे कृ.उ.बा.समितीचे सभापती मंचकराव पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, कृषी अधिकारी सचिन बावगे, सहाय्यक निबंधक आदिनाथ पालवे आदींसह मान्यवर उपस्थित होते. बुलढाणा मतदारसंघाचे आ. संजय गायकवाड यांनीही शेतकरी पवार यांनी बैलजोडी, कपडयाचा आहेर व वर्षभराचे राशन व रोख ५० हजार रूपये मदत केली.