रेणापूर तालुक्यात पहिल्यांदाच काँग्रेसच्या मताधिक्यात वाढ File Photo
लातूर

Congress vote share increase : रेणापूर तालुक्यात पहिल्यांदाच काँग्रेसच्या मताधिक्यात वाढ

पहिल्या क्रमांकावर असलेला भाजप गेला दुसऱ्या क्रमांकावर

पुढारी वृत्तसेवा

विठ्ठल कटके

रेणापूर : तालुक्यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. मध्यंतरी एक जिल्हा परिषद व सहा पंचायत समितीच्या जागेवर काँग्रेसची सत्ता प्रस्थापित होती तर इतर तीन जिल्हा परिषद सदस्य व आठ पंचायत समितीचे सदस्य भाजपाचे असल्यामुळे रेणापूर पंचायत समितीवर भाजपाचीच सत्ता होती. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनंतर निवडणुका झाल्या.

या निवडणुकीत एकहाती सत्ता असलेल्या भाजपला मतदारांनी नाकारत पंचायत समितीच्या सत्तेपासून दूर राहवे लागणार आहे. या निकालाने रेणापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. तालुक्यात पूर्वी जिल्हा परिषदेच्या तीन जागा भाजपकडे तर केवळ पोहरेगावची एकमेव जागा काँग्रेस पक्षाकडे होती. पानगाव व खरोळा जिल्हा परिषदेवर कायम भाजपचे वर्चस्व प्रस्थापित होते.

रेणापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच तर पंचायत समितीच्या दहा जागा होत्या. 2014 मध्ये रेणापूर नगर पंचायत अस्तित्वात आल्याने जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा कमी होऊन पानगाव, पोहरेगाव , खरोळा व कामखेडा हे चार जिल्हा परिषदेचे व पानगाव, कोष्टगाव, पोहरेगाव, निवाडा, खरोळा, कारेपूर, कामखेडा, मोटेगाव असे आठ पंचायत समितीचे गण अस्तित्वात आले.

अशा परिस्थितीत रेणापूर तालुक्यावर मध्यंतरीचे आठ वर्ष वगळता भाजपाचेच वर्चस्व कायम राहिले. मात्र 2026 च्या निवडणुकीत हे चित्र पार बदलून भाजपच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेच्या तीन जागेवरून भाजपा केवळ एका जागेवर निवडून आली. पोहरेगाव गटात सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे तर खरोळा गट वगळता पानगाव व कामखेडा गटात भाजपाची पीछेहाट झाली.

प्रथमच मनसेने पानगाव जिल्हा परिषद व दोन्ही पंचायत समितीवर सर्वाधिक मतांनी विजय मिळवून महाराष्ट्रात पानगावचे नाव अधोरेखित केले आहे.जिल्हा परिषदेच्या चार जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक 29 हजार 473 तर पंचायत समितीच्या आठ गणांमध्ये 30 हजार 26 मते घेऊन पूर्वी दोन क्रमांकावर असलेल्या काँग्रेस पक्षाने पहिला क्रमांक मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपाला जिल्हा परिषदेमध्ये 28 हजार 977 व पंचायत समितीमध्ये 29 हजार 126 मते मिळाली आहेत.

मनसेचे प्रांतसचिव संतोष नागरगोजे यांना सततच पराभव पत्करावा लागत होता या वेळी मात्र त्यांनी आपले संपूर्ण लक्ष निवडणुकीत केंद्रित केले होते. त्यामुळे मनसेने पानगाव या एकमेव जिल्हा परिषदेच्या गटात 7 हजार 766 तर पानगाव, कोष्टगाव या पंचायत समितीच्या गणात 6 हजार 781 मते घेऊन तालुक्यात तिसरा क्रमांक घेऊन पानगावची ओळख अख्या महाराष्ट्राला करून दिली. तर प्रथमच निवडणुक लढविलेल्या शिवसेना शिंदे गटाने कामखेडा जिल्हा परिषद गटात निवडणूक लढवून 3 हजार 754 तर पंचायत समितीमध्ये 1 हजार 266 मते घेतली .

वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेमध्ये 718 तर पंचायत समितीमध्ये 1 हजार 414 मते घेतली. अजित पवार गटाचा एकच उमेदवार उभा होता त्याला 392 मते पडली. प्रहार जन शक्ती पक्षाचाही एकच उमेदवार उभा होता त्यालाही 123 मते मिळाली.

या निवडणुकीत काँग्रेसचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख , भाजपाचे विद्यमान आमदार रमेश अप्पा कराड व त्र्यंबक भिसे तसेच काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी चार जिल्हा परिषदेच्या गटात व आठ पंचायत समितीच्या गणात विशेष लक्ष दिले होते.

त्यांनी अनेक सभाही घेतल्या परंतु मतदारांनी सत्तेचे पार राजकारणच बदलून टाकले. कोणालाही एकहाती सत्ता दिली नाही. जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस दोन, भाजप व मनसे प्रत्येकी एक तर पंचायत समितीमध्ये काँग्रेस भाजप प्रत्येकी तीन ( सहा ) , मनसे दोन जागा निवडून आल्या आहेत.

काँग्रेसच ठरणार किंगमेकर

रेणापूर पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. काँग्रेसकडे एकही महिला सदस्य नाही. भाजपकडे खरोळा गणातील शीतल प्रताप राऊतराव सर्वसाधारण (प्रथम दावेदार ) व कारेपूर गणातून अंजली राजेश काळे (ओबीसी) तर मनसेकडे पानगाव गणातून श्रीदेवी प्रकाश गालफाडे ( अनुसूचित जाती ) व कोष्टगाव गणातून मोनिका रवी सूर्यवंशी सर्वसाधारण ( प्रथम दावेदार ) या दोनच महिला आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाला सोबत घेतल्याशिवाय भाजप किंवा मनसेला पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करता येणार नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा किंगमेकर ठरणार आहे.

भाजप, मनसे एकत्र येतील का?

काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवायचे झाले तर भाजप आणि मनसे यांना एकत्र यावे लागेल. सभापतिपदासाठी या दोन्ही पक्षाकडेच सदस्य आहेत. मग हे दोन्ही पक्ष एकत्र येतील का? प्रथम सभापती कोण? या दोघांत सत्तेची वाटणी होईल का? की, या दोघांकडून काँग्रेसला उपसभापतिपद दिले जाणार, याची मात्र सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT