

अतुल शिनगारे
धारूर : धारूर तालुका - नाव घेताच डोळ्यांसमोर उभे राहते ते उसाच्या शेताकडे निघालेल्या मजुरांचे तांडे. दरवर्षी हंगाम सुरू होताच हजारो कुटुंबे घरदार, मातीचा सुगंध आणि गावचे जगणे मागे ठेवून परक्या प्रदेशाकडे निघतात. रोजगाराच्या शोधात सुरू होणारा हा प्रवास केवळ अंतराचा नसतो; तो असतो आशा-निराशा, कष्ट-संघर्ष आणि तडजोडींचा.
हंगाम संपत आला की कारखान्यांचे धुराडे शांत होऊ लागतात आणि मजुरांच्या परतीच्या वाटा पुन्हा गजबजतात. ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रक, टेम्पोमध्ये कोंबून भरलेल्या कुटुंबांचे तांडे गावाकडे धाव घेतात. महिनोनमहिने कष्टानंतर आपल्या घरट्याकडे परतण्याचा आनंद महिलांच्या आणि मुलांच्या चेहऱ्यावर झळकत असतो. परंतु या आनंदामागे दडलेली वेदना बाहेरून दिसत नाही - शिक्षणापासून वंचित राहिलेली पिढी आणि मजुरीच्या साखळीत अडकलेले आयुष्य. ऊस तोडणीच्या हंगामात अनेक मजूर लहान मुलांना सोबत नेतात.
अल्पवयातच या मुलांच्या हातात दप्तराऐवजी विळा येतो. शाळेच्या घंटानाद ऐवजी ट्रॅक्टरच्या घराघरात त्यांचे दिवस सरतात. या वर्षी परत शाळा सुटली, असे म्हणताना त्यांच्या आवाजातली खंत कुणी ऐकून घेत नाही. शिक्षणाची दोरी तुटते आणि पुढे चालून हीच मुले मजुरीचा वारसा स्वीकारतात. पिढ्यान्पिढ्या चालणाऱ्या या चक्रात स्वप्ने, करिअर, संधी - सगळे काही उसाच्या ढिगाऱ्यात गाडले जाते.
धारूर तालुक्याची ओळख केवळ उसतोड मजुरांचा तालुका अशीच राहू नये, यासाठी ठोस पावले आवश्यक आहेत. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती पर्याय उभे करणेग्रामीण व लघुउद्योगांना चालना देणे स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी चलंत/हंगामी शाळांची प्रभावी अंमलबजावणी आरोग्य व सामाजिक सुरक्षेच्या सुविधा बळकट करणे हे उपाय केवळ धोरणांपुरते न राहता प्रत्यक्षात उतरले, तरच या चक्राला खऱ्या अर्थाने ब्रेक लागेल. कारखाने बंद होताच मजुरांचे तांडे परतत आहेत. चेहऱ्यावरचा आनंद खरा, पण मुलांच्या शिक्षणाची राखरांगोळीही तितकीच खरी.
ऊसासाठी स्थलांतर, शिक्षणासाठी संघर्ष - धारूरच्या मुलांचे विस्थापित आयुष्य हा तालुक्याचा करुण वास्तव बनले आहे. पिढ्यान्पिढ्या चालणारे हे स्थलांतराचे चक्र कधी थांबेल? या प्रश्नाचे उत्तर आजही धूसरच आहे. परतीच्या वाटेवरून येणाऱ्या प्रत्येक ट्रॉलीत एक कथा असते - कष्टांची, आशेची आणि अपुऱ्या स्वप्नांची. गावातल्या मातीवर पाय ठेवताना त्यांच्या डोळ्यांत चमकते ते समाधान; पण त्या चमकदार क्षणामागे दडलेली वेदना समाजाने आणि व्यवस्थेने समजून घेण्याची गरज आहे. कारण उसाच्या शेतात केवळ ऊस वाढत नाही - तिथे वाढते एक पिढी, जी अजूनही आपल्या उज्ज्वल उद्याची वाट पाहते.
परतीचा आनंद, पण भविष्याची काळजी
गावात पाय ठेवताच मातीचा गंध मन भरून टाकतो. सण-समारंभ, नातीगोती, आपल्या माणसांचा सहवास - या सगळ्यांनी थकवा हलका होतो. पण काही दिवसांतच वास्तव पुन्हा डोके वर काढते.स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती पर्याय अपुरे. शेतीपूरक उद्योगांचा अभाव, हमीभाव व उत्पन्नाची अनिश्चितता - त्यामुळे पुढच्या हंगामात पुन्हा स्थलांतर अपरिहार्य ठरते.