Devendra Fadnavis tribute Congress leader Shivraj Patil Chakurkar
लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवारी (दि.१२) सकाळी निधन झाले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथे दुपारी देवघर निवासस्थानी चाकूरकरांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. राजकारणातला योगी म्हणून शिवराज पाटील चाकूरकरांनी जीवन व्यतीत केले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र व देशाची मोठी हानी झाली, असे उद्गार मुख्यमंत्री यांनी काढले.
राजकीय पक्षांच्या भिंतीच्या पलीकडे, जाती धर्म भाषेच्या भिंतीच्या पलीकडे दिवंगत नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे नेतृत्व राहिले आहे. दोन वेळा विधानसभा सदस्य व सात वेळा लोकसभा सदस्य असलेले शिवराज पाटील यांच्या संपूर्ण राजकीय आयुष्यामध्ये कधीही एक दाग लागला नाही, की भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. अतिशय स्वच्छ चारित्र्य त्यांनी ठेवले. उत्तम वक्ता म्हणूनही त्यांची ओळख होती. मराठी, हिंदी, इंग्रजी या सर्व भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ज्या प्रकारे कामकाज हाताळले त्यामुळे त्या अध्यक्षपदाचा बेंचबार तयार करण्याचे काम केले. सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांची त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. ते आपले विचारांशी नेहमी कटीबद्ध राहिले. पण प्रत्येक विचाराचा त्यांनी सन्मान केला, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
शिवराज पाटील चाकूरकर यांच्याशी माझा वैयक्तिक संबंध अनेक वेळा आला. माझ्या मागच्या कार्यकाळात जे लोकहिताचे निर्णय घेतले त्याबद्दल त्यांनी फोनवरून हे निर्णय सामाजिक परिवर्तन घडविणारे असल्याचे सांगून अभिनंदन केले होते. अशा मोठ्या मनाच्या नेत्याला आज आपण गमावले आहे. महाराष्ट्रातील जनता व महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चाकूरकरांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता सुसंस्कृत राजकारणाचा कानमंत्र
दिवंगत नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्याप्रति भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आठवण सांगितली. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या स्नुषा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर भाजपमध्ये आल्या होत्या, तेव्हा शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले होते की, मी जीवनभर जिथे आहे तिथेच राहणार आहे. पण आता अर्चनाताईंनी जो मार्ग निवडला आहे, त्यासाठी माझ्या सदिच्छा आहेत. तुम्ही उत्तम प्रकारे त्यांची काळजी घ्या. चांगलं सुसंस्कृत राजकारण झालं पाहिजे, याकडे लक्ष द्या.