लातूर : अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यासह अन्य दोघांचे पुरवणी जबाब विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी रविवारी (दि. 27) सायंकाळी घाडगे उपचार घेत असलेल्या अपोलो रुग्णालयात जाऊन घेतले.
आपल्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व त्यांच्या साथीदारावर जुजबी कलमाखाली गुन्हे नोंदवून त्यांना टेबल जामीन दिल्याचा आरोप घाडगे यांनी केला होता. या कारवाईमुळे अनेक पक्ष संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती.
विशेष म्हणजे उपचार सुरू असतानाच घाडगे यांनी थेट पुणे गाठून राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबद्दल सांगत पुरवणी जबाब घेण्याची व बीएनएस च्या कलम 109 अंतर्गत हल्लेखोरांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी केली होती. अजित पवार यांनी याबाबत लातूरचे पोलीस अधीक्षक तांबे यांना पुरवणी जबाब घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शनिवार (दि.26 )रोजी विजयकुमार व्यंकटराव घाडगे पाटील, मनोज शेषराव लंगर व दीपक संदिपान नरवडे यांना पुरवणी जबाब देण्यासंदर्भात शनिवारी पोलिसांनी नोटीस बजावली होती त्यानुसार या तिघांनी रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जबाब दिले व ते पोलिसांनी नोंदवल्याचे भगवान माकने यांनी सांगितले. या जवाबानंतर पोलीस कोणती कलम वाढ करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे