लातूर : माजी केद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचा शांत स्वभाव सर्वश्रूत आहे तथापि ज्यासाठी मोठे धाडस, समयुचकता अन अचुक संतूलन लागते त्या अश्वारोहण, घोडेस्वारी अर्थात हॉर्स रायडींगमध्येही पाटील पारंगत होते, त्यांनी उधळलेल्या घोड्याला वठणीवर आणत सर्वांची शाबासकीही मिळवली होती यावर क्वचीत कोणाचा विश्वास बसेल. पण हे सारे खरे होते याची आठवणच शिवराज पाटील यांनी त्यांच्या ओडीसी ऑफ माय लाईफ या आत्मचरित्रात सांगितली आहे.
शिवराज पाटील हे त्यांचे आजोबा वीर भगवंतराव पाटील यांचे लाडके नातू होते. भगवंतरावाकडे एक उमदा घोडा होता. त्याच्या पाठीवर आजोबांना आपल्या नातवाला बसवायचे होते. घोडा खूर आपटत असल्याने नातवाची भीतीने गाळण झाली होती व ती त्यांनी आपल्या लाडक्या आजोबापाशी त्याक्षणी व्यक्तही केली होती. मात्र आजोबांना हे पटले नाही त्यांनी शिवराज पाटलांना उचलून घोडयाच्या पाठीवर टाकले. त्यानंतर घोडा अधिकच बिचकला समोरचे पायही त्यांनी उचलले परिणामी शिवराज पाटील यांनी लगाम घट्ट पकडली.
घोडा नियंत्रणात आल्यानंतर आजोबांनी शिवराज पाटलांना घोडयावरुन उतरवत तू फार भीत्रा आहेस असे म्हणून घरी पाठवले. त्यावेळीच आपण उत्तम घोडेस्वार व्हायचे असा संक्लप पाटील यांनी केला. प्रशिक्षण घेतले तर सारे काही ठिक होईल, असे त्यांनी ठरवले व तसा सरावही सुरू केला. सरावात सातत्य ठेवले व ते चांगले घोडेस्वार झाले. याची साक्षही सर्वांना एका घटनेने दिली.त्याचे झाले असे एक लग्न समारंभ आटोपून पाटील परीवार गावाकडे जात होता. यावेळी काहीजण बैलगाडीत तर काही तरुण घोड्यावर होते.
वाटेत पाऊस सुरूझाला. त्यावेळी एकाने पाटील यांना पावसात भिजू नये म्हणून एक छत्री दिली व ती त्यांनी उघडताच घोडा उधळला. आजोबा भगवतरावांना हे लक्षात आले अन त्यांनी बैलगाडीतून उडी मारली व घोड्याकडे धाव घेतली. त्याचा लगाम पकडून त्याला नियंत्रीत करण्याचा ते प्रयत्न करु लागले परंतु घोडयाने त्यांनाच फेकले यावर शिवराज पाटील यांनी आजोबाला लगाम सोडून बाजूला होण्यास सांगितले.
त्यानंतर शिवराज पाटील यांनी घोड्याला पळू दिले तो शांत झाला अन त्याच्यावर ते स्वार झाले अन स्वारी परिवारापर्यंत पोहचली. त्यांना पाहून आजोबांनीही नातवाच्या पाठीवर शाबासकी दिली. आता तू कोणत्याही घोड्यावर स्वार होऊ शकतोस असा विश्वासही व्यक्त केला अन नातवाला अत्यानंद झाला.