चाकूर : चाकूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, इंदिरानगर येथे गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेला हातपंप गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांच्या पुढाकारातून दुरुस्त करून सुरू करण्यात आला. जवळपास दोन तास शाळेत थांबून त्यांनी स्वतः लक्ष घालत हा प्रश्न मार्गी लावल्याने विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सुटली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली होती. तसेच खाऊ शिजवण्यासाठी व इतर वापरासाठीही पाण्याची टंचाई भासत होती. ही गंभीर बाब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पप्पूभाई शेख यांनी गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांच्या निदर्शनास आणून दिली.त्यानंतर वंगवाडे यांनी तत्काळ शाळेला भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
जवळपास दोन तास शाळेत थांबत पंचायत समितीचे पाणीपुरवठा कर्मचारी हाकानी शेख तसेच नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हातपंप उघडून त्याची दुरुस्ती करण्यात आली. तपासणीदरम्यान हातपंपातील काही पाईप खराब झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वंगवाडे यांनी तात्काळ नवीन आठ पाईप बदलण्याच्या सूचना दिल्या. पाईप बदलल्यानंतर दहा वर्षांपासून बंद असलेला हातपंप पुन्हा सुरू झाला आणि त्या ठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध झाले.
या कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला असून शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणीप्रती असलेली वंगवाडे यांची तळमळ, संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षता यामुळे आदर्श प्रशासकीय कार्य कसे असावे याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पप्पूभाई शेख यांनी गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांचे आभार मानले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पप्पूभाई शेख, नितीन डांगे, पत्रकार शिवशंकर टाक, सदाशिव मोरे, मुख्याध्यापक प्रभाकर कांबळे, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.