Chakur taluka flooded with heavy rain
संग्राम वाघमारे
चाकूर : तालुक्यात गुरुवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात मोठे नुकसान झाले अनेक गावांत, शेतात पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या, नाले आणि तलाव तुडुंब झाले आहेत चाकूर शहरात मुख्य रस्त्यावर कमरेला पाणी आल्याने व ते नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
काही ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे. चाकूर शहरात उदगीर, येरोळ, झरी, बोथी, आटोळा, चापोलीहून येणाऱ्यांचा नद्या, नाल्यांना पूर आल्यामुळे संपर्क तुटला आहे. शेळगांव येथील तिरू नदी दुथडी भरून वाहत आहेत. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चाकूर आटोळा रस्त्यावर पाणीच पाणी आल्याने रेल्वेपूल पाण्यात गेल्यामुळे त्या भागातील गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील कैलास टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पाणीच पाणी वाहत आहे. शेतकऱ्यांच्या गोठ्यात, रानात पाणी शिरले आहे, अख्खे पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. घरणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
या पावसाने सांडोळ पाझर तलाव क्रमांक १ या तलावास धोका निर्माण झाल्यामुळे तलावाचे पाणी सांडव्यावाटे काढून देण्यात आलेले आहे. घरणी नळेगाव मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. बोथी तलाव शंभर टक्के भरला आहे. डोंग्रज गावात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून तेथील शेतात आणि घरांमध्ये पाणी साचले आहे. टाकळगाव येथील घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल आणि आर्थिक नुकसान झाले आहे. चाकूर शहरातील उजळंब रोडवरील अनेक घरांत पाणी शिरल्याने नागरिकांना घरातील पाणी उपसण्याची वेळ आली. याचा लहान बालके आणि महिलांना नाहक त्रास सोसावा लागला आहे.
लक्ष्मी नगर, बौध्द नगर, सुतार वाडा, पेट मोहल्ला, मस्जिद चौक या भागाला व तेथील परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. नाल्या तुडुंब भरून वाहल्याने ते पाणी नागरिकांच्या घरात शिरले. या साचलेल्या पाण्याने घरातील अन्नधान्य भिजून संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रसंगी नागरिकांना पाण्यातून चाचपडत रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. चापोली, बोथी, शेळगाव, वडवळ, झरी, नळेगाव जानवळ भागात पावसाने गुरुवारी हजेरी लावली. त्यामुळे अनेक गावांना पावसाचा तडाखा बसून शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे. चाकुरातील अनेक शाळांना या पावसाने गळती लागली असून शाळेमध्ये पाणी साचल्याचा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. अचाकूर शहरात काही झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे विजेचे खांबे पडल्याने विजेच्या तारा तुटल्या आहेत.
घरणी येथील माधव सोमनाथ यंचेवाड, दत्तात्रय सोमनाथ यंचेवाड, शिवशंकर यंचेवाड, विष्णू यंचेवाड या शेतकऱ्याच्या शेतातील आठ एकर सोयाबीन आणि दीड एकर काढणीला आलेले टोमॅटो पावसाच्या पाण्याने चक्क आडवे पडले.
चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या केंद्रीय विद्यालय परिसरातील कालवा ओसंडून वाहत असल्यामुळे तेथे पाणीच पाणी झाल्याने रास्ता आणि पाण्याचा अंदाज येत नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्यासाठी सैन्यांना पाचारण करण्यात आले होते.