

जयपाल ठाकूर
औसा : औसा तालुक्यात काल (दि. २७) रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तावरजा व तेरणा नद्या तसेच विविध नाल्यांना पूर आला. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून नदी, नाल्याचे पाणी शेतीत शिरून मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे.
रात्रभर कोसळलेल्या या पावसामुळे संपूर्ण तालुक्यात सरासरी ५७. ३ मि.मी. पाऊस झाला असून औसा तालुक्यातील लामजना, किनी, किल्लारी महसूल मंडळात अतिवृष्टी गेल्या १२ तासात औसा तालुक्यात मंडळनिहाय पडलेला पाऊस औसा ४८.५ मिली मिटर, लामजना -७२.५ मिलिमीटर, मातोळा ३२.३ मिलिमिटर, भादा ५५ मिलिमीटर, बेलकुंड ४२.५ मिलिमिटर, किनी-१०२.८ मिलिमिटर, किल्लारी - ७२.५ मिलिमिटर तर उजनी ३२.३ मिलिमिटर औसा तालुक्यातील तावरजा हे धरण १०० टक्के भरले आहे तर तेरणा नदीवरील माकणी घरण १०० टक्के भरले असून तालुक्यातील इतर माध्यम व लघुप्रकल्प या पावसामुळे ८० टक्क्यापेक्षा जास्त भरली आहेत.
पावसामुळे तालुक्यातील वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली. आलमला, संक्राळ, हसलगण, उटी गावचा संपर्क तुटला. आलमला औसा मार्गावरील खादीभांडार जवळील पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. आलमला बुधोडा मार्गावरील तात्पुरता पूल वाहून गेल्याने लातूर ला जाणारी वाहतूक बंद होती तर उटी येथील पुलावर पाणी असल्याने उटी औसा वाहतूक बंद आहे. जवळगा पो मातोळा मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या संक्राळ, हसलगण, मातोळा या गावाची वाहतूक दुपारी २ वाजेपर्यंत बंद होती. या अतिवृष्टीमुळे भादा, मातोळा परिसरात उभे उसाचे पीक आडवे पडले आहेत.
अनेक गावातील खरीप पिकात पाणी थांबले आहे तर अनेक ठिकाणी नदी, नाल्या काठाच्या सुपीक जमीन खरडून गेल्याने उभ्यास पिकाचे आणि जमीनचा गाळाचा भाग वाहून गेल्याने शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासनाकडून तातडीने मदत व नुकसानभरपाईची मागणी होत आहे.
तालुक्यातील तावरजा धरण १०० टक्के भरले असून धरणाचे १२ दरवाजे दुपारी २ वाजता उघडल्याने पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात तावरजा नदीपत्रात होत असल्याने नदीकाठच्या सर्व गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
तेरणा नदीवरील माकणी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. लातूर जिल्ह्यात अजूनही पावसाचा अंदाज असल्याने येवा नदीपत्रात सोडला जाऊ शकतो त्यामुळे तावरजा आणि तेरणा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला असून आपली जनावरे व साहित्य योग्य ठिकाणी हलवावे व पुलावरून पाणी वाहत असल्यास कोणीही पाण्यातून जाऊ नये असे औशाचे तहसीलदार घनशाम आडसूळ यांनी आवाहन केले आहे.