Chakur police have arrested illegal gutkha sellers
चाकूर : पुढारी वृत्तसेवा
शासन प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची बेकायदेशीररीत्या विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या दोघांच्या शनिवारी सकाळी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून सत्तर हजारांचा गुटखा जप्त करून त्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सहायक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांच्या पथकातील पोलिस हवालदार सिराज शेख, दीपक सोनकांबळे, व्यंकट हंगरगे यांनी चाकूर येथील उजळंब रस्त्यावर एका एम एच ०३ बी सी ५४४२ कारची तपासणी केली. त्यावेळी कारमध्ये शासन प्रतिबंधित असलेला ७० हजार दोनशे रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू आढळून आला.
घटनास्थळावरून पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीच्या कारसह हा मुद्देमाल जप्त केला आहे. पो.कॉ दीपक सोनकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास रमाकांत गोलावार (वय २५) व दिगांबर माणिक धोंडगे (वय ५३) दोघेही रा. चाकूर यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पंकज निळकंठे हे करीत आहेत.