लातूर : पुढारी वृतसेवा
नीट पेपरफुटी प्रकरणातील सध्या न्यायालयीन कोठडीत असेलेले संजय तुकाराम जाधव व जलीलखाँ उमरखाँ पठाण यांनी येथील न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यावर गुरुवारी (दि.२५) सीबीआयने आपले म्हणणे न्यायालयास सादर करुन त्यात या दोघांनाही जामीन मंजूर करू नये, अशी विनंती केली आहे. आज २६ जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे. (NEET UG scam)
व्यवसायाने शिक्षक असलेला संजय तुकाराम जाधव (रा. लातूर) याचा नीट पेपरफुटीत सहभाग असल्याच्या संशयावरुन नांदेड एटीएसने त्याची चौकशी केली होती आणि त्याला सोडून दिले होते. तथापि, गरज भासल्यास बोलावले जाईल. त्यामुळे तुम्ही कोठेही जावू नका असे त्याला बजावले होते. तरीही तो फरार झाला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला २४ जून रोजी अटक केली होती. या प्रकरणातील दुसरा आरोपी तथा कातपूर कातपूर गावच्या जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक जलीलखाँ उमरखाँ पठाण याला २३ जून रोजी पोलिसांनी अटक केली होती. या दोघांनाही प्रारंभी पोलिस, त्यानंतर सीबीआय कोठडी मिळाली होती. सध्या हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान या दोघांनीही लातुरच्या न्यायालयात त्यांच्या जामीनासाठी अर्ज केले आहेत. यावर न्यायालयाने सीबीआयला त्यांचे म्हणणे दाखल करण्यास सांगितले होते. त्यावरुन गुरुवारी सीबीआयने ते दाखल केले. यात सीबीआयचे अधिकारी कुणाल अरोरा यांनी या प्रकरणाचा तपास अतिशय निर्णायक वळणावर आला असून तपासादरम्यानच्या आरोपींच्या वर्तनावरुन तसेच मिळालेल्या माहिती व पुराव्यावरुन त्यांना न्यायालयीन कोठडीतच ठेवणे योग्य आहे. त्यांना जामीन दिला तर ते साक्षीदांरास फितवू शकतात, पुरावे व नोंदी नष्ट करु शकतात. या प्रकरणाची पाळेमुळे विस्तारली असून जाधव व पठाण हे अन्य राज्यातील संशयितांच्या संपर्कात होते असे तपासादरम्यान आढळले आहे.
ते कोणा - कोणाच्या संपर्कात होते? किती जणांना त्यांच्यापासून अवैद्य आर्थिक लाभ झाला आहे, या पैशाचा वापर कशासाठी झाला आहे? त्याचे कोणी भागीदार आहेत? याचे भक्कम पुरावे मिळवायचे आहेत. साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरु आहे. शिवाय या प्रकरणातील इराण्णा कोनगलवार हा गुन्हा दाखल झाल्या दिवसापासून फरार आहे. त्याचाही शोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संजय जाधव व जलीलखाँ पठाण यांना जामीन देऊ नये अशी विनंती सीबीआयने न्यायालयास केली आहे.