Cases filed against 16 people in Udgir sand case
उदगीर, पुढारी वृत्तसेवा : प्रतिनिधी
शहरातील ग्रामीण व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी २८२ ब्रास वाळू चोरट्या मार्गाने आणून विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केली होती. ती वाळू पोलिसांनी शुक्रवारी जप्त केली. तिची किंमत १४ लाख १० हजार रुपये आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात १० व शहर पोलिस ठाण्यात ६, अशा एकूण १६ जणांविरुद्ध शनिवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपासून अवैध मार्गाने अनेक टिप्परमधून वाळूची चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार ग्रामीण व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील येणकी मानकी रोड, रेल्वे स्टेशनसमोर, समतानगर, जळकोट रोड परिसरात शुक्रवारी पोलिस व महसूल प्रशासनाने कारवाई करीत एकूण २८२ ब्रास वाळू (किंमत १४ लाख १० हजार रुपये) जप्त करण्यांत आली.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी सर्फराजखान गोलंदाज यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात शेख अहमद अब्बास, मोहम्मद इब्राहिम इसाक शेख, बालाजी संग्राम कुलाल, दस्तगीर चाँदखाँ पठाण, वजीर रफिउद्दीन कादरी, शादाब जागीरदार, तर ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी राजकुमार डबेटवार यांच्या तक्रारीवरून नंदकुमार सुभाष कुलाल, खदीर यादुल शेख, राहुल विश्वनाथ कांबळे, श्रीकृष्ण मुंडे, प्रभू हावगी बिरादार, श्यामलाबाई मंगेश देवणे, राजकुमार देवीदास गवाणे, लहू महादेव बिरादार, अंकुश महादेव बिरादार (सर्व रा. उदगीर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.