Cannabis cultivation right next to a house in Kavha
लातूर, पुढारी वृत्तसेवा : घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत चक्क गांजाची लागवड करून त्याची निगा राखणाऱ्या व्यक्तीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. कव्हा येथील कोळी गल्ली परिसरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी १३ किलो ६५२ ग्रॅम वजनाची हिरवी गांजाची झाडे जप्त केली असून, त्याची किंमत सहा लाख ८२ हजार ६०० रुपये आहे. या प्रकरणी मुक्तार गफुरसाब शेख (वय ४५, रा. कोळी गल्ली, कव्हा) याच्याविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला कव्हा येथील एका व्यक्तीने घराच्या पाठीमागील खुल्या जागेत गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची पडताळणी करून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईची तयारी केली.
पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे यांच्या पथकाने नायब तहसीलदार, शासकीय पंच आणि प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या भ्रमण वैज्ञानिक पथकासह कव्हा येथे छापा टाकला. संशयित मुक्तार शेख हा त्याच्या घराच्या परिसरात आढळून आला.
जागेची पाहणी केली असता घराशेजारील खुल्या जागेत गांजाची झाडे लावून त्यांची निगा राखली जात असल्याचे आढळले. या प्रकरणी मुक्तार शेख याच्याविरुद्ध लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१३ किलोची झाडे ताब्यात
पोलिसांनी वैज्ञानिक पथकाच्या मदतीने गांजाची झाडे उपटून त्यांचे वजन केले. त्यात एकूण १३ किलो ६५२ ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. प्रति किलो ५० हजार रुपये दराने त्याची किंमत सहा लाख ८२ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुद्देमाल दोन पोत्यांत भरून सीलबंद करण्यात आला असून, संपूर्ण कारवाईचे चित्रिकरण करण्यात आले आहे.