औसा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा  file photo
लातूर

BJP victory in Ausa Panchayat Samiti : औसा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा

जिल्हा परिषद गटात भाजपा, काँग्रेसला समान जागा

पुढारी वृत्तसेवा

जयपाल ठाकूर

औसा : औसा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस ने समान चार जागावर विजय मिळवला तर पंचायत समितीवर भाजपाने दणदणीत यश मिळवत राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. आमदार अभिमन्यू पवार यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे सर्व प्रमुख पक्ष एकत्र आले होते.

सर्वाना जोरदार टक्कर देत 9 जिल्हा परिषद गटापैकी 4 गटांवर भाजपाने विजय मिळवला तर पंचायत समितीच्या 18 जागांपैकी भाजप 11 जागेवर विजय मिळवत तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण केले आहे.

औसा तालुक्यातील एकूण नऊ जिल्हा परिषद गटांपैकी चार गट भाजपने जिंकले असून काँग्रेसला चार जागावर तर एका गटात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ला यश मिळाले आहे. तालुक्यातील 9 गटापैकी 4 भाजपा, 4 काँग्रेस आणि शिवसेना उबाठा 1 तर पंचायत समितीमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपाला तब्बल 11 जागेवर विजय मिळाला तर काँग्रेस 5 आणि अपक्ष 1 उमेदवार निवडून आले आहेत.

लोदगा गटात भाजपाचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता यांच्या पत्नी पूनम मुक्ता यांनी उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या पत्नी अरुणा संतोष सोमवंशी यांना 2510 मतांनी पराभूत केले. आलमला गटात भाजप कडून शीतल रविकुमार चिलमे यांनी काँग्रेस च्या उर्मिला नारायण मिठापाल्ले यांच्या 1987 मतांनी पराभव केला.

आशीव जिल्हा परिषद गटातून लातूर जिल्हा काँग्रेसचे माजी प्रभारी भाऊसाहेब गोरे यांच्या सुनबाई सई पृथ्वीराज गोरे यांनी भाजपच्या माजी आमदार दिनकरराव माने यांच्या सुनबाई सदिच्छा विनोद माने यांचा 595 पराभव केला.मातोळा गटातून संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याचे चेअरमन शाम भोसले यांच्या पत्नी दीपाली भोसले या काँग्रेसकडून रिंगणात होत्या त्यांनी भाजपचे जिल्हा सरचिटणीस काकासाहेब मोरे यांच्या पत्नी कविता मोरे याचा 2908 मतांनी पराभव केला.

उजनी जिल्हा परिषद गटात भाजपकडून माजी पंचायत समिती सदस्य संदीपान शेळके यांनी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नारायण लोखंडे यांचा पराभव केला. किल्लारी गटात काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पवार यांनी भाजपचे युवराज बिराजदार यांचा 1057 मतांनी पराभव केला. भादा गटात भाजप छाया पद्माकर चिंचोलकर यांनी काँग्रेसच्या पूजा अण्णासाहेब होदाडे यांच्यात अटीतटीची लढत होऊन केवल 59 मतांनी निसटता पराभव केला.

खरोसा गटात उबाठा तानाजी भानुदास जाधव यांनी भाजपच्या अजय राजेंद्र साळुंके यांचा 267 मतांनी पराभव केला. लामजना गटातून काँग्रेस चे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामदास चव्हाण यांच्या पत्नी शालिनी रामदास चव्हाण यांनी भाजपच्या मंदाकिनी विठ्ठल बेडजवळगे यांच्या 1112 मतांनी पराभव केला. औसा तालुक्यातील 9 गटांपैकी लोदगा वगळता उर्वरित बहुतांश गटांत भाजप व काँग्रेस अशी सरळ लढत झाली.

पंचायत समितीवर भाजपाची एकहाती सत्ता

औसा पंचायत समिती निवडणुकीत आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बस्वराज पाटील आणि माजी आमदार दिनकर माने या तिकडीने आपली ताकद लावली व भाजपने 18 पैकी 11 जागावर विजय मिळवत एकहाती सत्ता आणली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT