निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी (Aurad Shahajani) येथे मागील शंभर- दीडशे वर्षांपासून धुलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी कृत्रिम हत्तीची आणि रंगपंचमीच्या (Rang Panchami) दिवशी सिंहाची मिरवणूक काढण्याची प्रथा आजही जपली जात आहे. येथील लिंगायत समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी सुरू केलेली ही परंपरा आजही नव्या पिढ्यांद्वारे पुढे चालू ठेवण्यात आली आहे.
प्रारंभी कै. मडोळय्या डोंगे, कै.काशीनाथ गस्तगार, कै. काशीनाथ वलांडे, कै. चंद्रकांत अंबुलगे, कै. रामण्णा डोंगे, कै. शरणाप्पा ऐनापुरे, कै. वसंतराव हुंडेकर, कै. बाबूराव शेटगार, बाबूराव मरळे, कै. विश्वनाथ सज्जनशेट्टी, कै. सोमनाथ मंगशट्टे, कै. महालिंगप्पा लातूरे, मुर्गेअप्पा टेंकाळे, दत्तोपंत सगर आदींनी या परंपरेला दृढ स्वरूप दिले. यानिमित्ताने धुलिवंदनच्या दुसऱ्या दिवशी रात्री श्री विरुपाक्षेश्वर मठातून हत्तीची मिरवणूक काढली जाते. बैलगाडीमध्ये ज्वारीच्या कडब्यापासून बनवलेल्या दहा फुटाच्या हत्तीवर राजाही बसवला जातो. ती मिरवणूक लिंगायत गल्ली, मारवाडी गल्लीतून पुन्हा विरूपाक्षेश्वर मठात संपते.
रंगपंचमीच्या दिवशी रात्री लाकडी भूश्यापासून बनवलेल्या पाच फुटी सिंहाची मिरवणूक येथील गुरबसप्पा राचोटीप्पा मठातून निघून लिंगायत आणि मारवाडी गल्लीतून परत गुरबसप्पा मठात संपते. या मिरवणुकीत हत्ती आणि सिंह तयार करून त्यावर कपड्यांची सजावट केली जाते. ही सजावट गावातील मल्लिकार्जून गणाचारी, सिद्रामप्पा पुराणे, रविंद्र अंबुलगे, करबसय्या स्वामी आदींकडून केली जाते. त्या मिरवणुकीसमोर 'कोल' म्हणजेच टिपऱ्यांचा खेळ खेळला जातो. यासाठी कन्नड, मराठी आणि हिंदी जुन्या गीतांचा वापर करून खेळात रंगत आणली जाते. यामध्ये 'तंगी या ऊर आवा, येन छंद कानस्ताना' यासारखे कन्नड गाणे, 'बाबा नार बडी प्यारी, दुनिया झुका दिया सारी', 'प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है', 'महाराष्ट्राच्या मानकऱ्यांनो, गर्जा जयजयकार जय शिवछत्रपतींचा' अशा हिंदी आणि मराठी मनोरंजक, देशभक्तीपर गीतांचा समावेश आहे. आजही काशिनाथप्पा सजनशेट्टी, रघुनाथप्पा मंगशेट्टे पन्नास वर्षांपूर्वीच्या जुन्या हार्मोनियमचा वापर करून गाणे म्हणतात आणि सोमनाथ अंबुलगे, शिवराज राघो, सिद्राम टेंकाळे, राजप्पा शंकद, शिवकुमार मंडगे, राम गस्तगार, मल्लिकार्जून लातूरे, विश्वनाथ म्हेत्रे, सुधाकर शेटगार, कुमार गस्तगार आदी सहकारी त्यांना तबला, गायन व टाळची साथ देतात. या सर्वांनी आजही ही प्रथा सुरू ठेवली आहे.
लिंगायत समाजाकडून ही परंपरा चालू ठेवली गेली असली तरी गावातील विविध जातींतील लोक, मुले व मुली टिपरे खेळण्यासाठी सहभागी होतात. हा टिपऱ्यांचा खेळ होळी ते रंगपंचमी यादरम्यान खेळला जातो. परंतु याच्या तयारीसाठी होळी पूर्वीच पंधरा दिवस आधीपासून तरूण एकत्रित येऊन तयारी करतात.
पूर्वी टिपरे खेळण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून सर्व जाती-धर्मातील लोक येत असत. यावेळी मराठी, कन्नड व हिंदी भाषेतील मनोरंजक लोकप्रबोधनपर आणि देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून टिपऱ्यांच्या खेळात रंगत भरली जात असे. तसेच राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, वाघ, मसणजोगी इत्यादी विविध प्रकारचे सोंग घेऊन मोठ्या उत्साहाने सण साजरा केला जात असे. संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जात व लोकही मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी होत असत. जशी जशी करमणुकीची साधने, थिएटर वगैरे गावात आली तसा लोकांचा याकडील ओढा कमी झाला आणि उत्सवाचे स्वरूप छोटे झाले अशी माहिती ज्येष्ठ नागरिक उदंडय्या पुराणे यांनी दिली.
विशेष म्हणजे, तीन पिढ्यांचा एकत्र सहभाग या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करतो. समाज प्रबोधन व सामाजिक एकतेच्या दृष्टीने या उपक्रमाला मोठे महत्त्व आहे. निलंगा तालुक्यात आणि औराद परिसरात या परंपरेची मोठी प्रसिद्धी असून पुढील काळातही ती परंपरा चालू ठेवण्याची भावना लिंगायत समाजातील तरूण बोलून दाखवतात.