औराद शहाजानी : गोरक्षक तरुणांवर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ औराद शहाजानी येथे हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने जाहीर निषेध मोर्चा काढून गावातील व्यापार बंद ठेवण्यात आले.
शनिवार दि.16 मे रोजी औराद येथे लातूर येथील आदर्श जैन या गोरक्षकावर औराद व परिसरातील गोवंश वाहतूक करणाऱ्यांकडून जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या ठिकाणी पोलीस वेळीच पोहोचल्यामुळे त्या गोरक्षकाचा जीव वाचला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या या मोर्चाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात आली.
शेळगी रोड, बिदर रोड व मुख्य रस्त्याने पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने गावातील युवक व व्यापारी यांनी भगवे फेटे व दुपट्टे परिधान करून सहभाग घेतला होता. मोर्चा दरम्यान सहभागी कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
निषेध मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी शेळगी रोड, बिदर रोड व गावातील मुख्य रस्त्यावरून जात दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. बहूतांश व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून झालेल्या घटनेचा निषेध केला व तीव्र भावना व्यक्त केल्या. या निषेध मोर्चात गावातील पद्मसिंह पाटील, किरण रेड्डी, पवन मालपाणी, शिवा शेटगार, केरबा आमले आदी तरूण व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गोरक्षकांवर झालेला हल्ला अमानुष असून दोषींना तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भावना लखन बोंडगे, भाऊराव बिरादार यांनी व्यक्त केली. तसे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले. दरम्यान, संबंधित हल्ला प्रकरणात औराद शहाजानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सपोनि हनुमंत बांगर यांनी दिली.