Amit Deshmukh embroiled in controversy over praise for Tipu Sultan; BJP takes an aggressive stance
लातूर, पुढारी वृत्तसेवा : टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. टिपू सुलतान यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे वक्तव्य देशमुख यांनी केले होते. या विधानावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) देशमुखांवर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान, आमदार धीरज देशमुख यांनी अमित देशमुख यांची उघड पाठराखण करत विरोधकांवर टीका केली आहे.
या संपूर्ण वादावर लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी अमित देशमुखांची पाठराखण करताना म्हणाले, "विरोधक केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी या विषयाचा नाहक वाद निर्माण करत आहेत.
आम्ही सर्वधर्मसमभाव मानणारे लोक आहोत. कला, संगीत आणि सामाजिक एकतेच्या भावनेतून या कार्यक्रमांकडे पाहिले पाहिजे. भारताचे संविधान सर्व जाती, धर्म आणि प्रांतांच्या हिताचा विचार करते आणि आपण त्याच संविधानानुसार एकसंघ राहून काम करतो."
उदात्तीकरण खपवून घेणार नाही : नितेश राणे
अमित देशमुख यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत, "महाराष्ट्रात टिपू सुलतानचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही. असा प्रयत्न करणाऱ्यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा दिला.
पुढील पिढीला इतिहास सांगण्याची गरज : अमित देशमुख
लातूर येथे 'सार्वजनिक जयंती उत्सव समिती' आणि 'शहीद टिपू सुलतान सार्वजनिक जयंती समारोह समिती'च्या वतीने एका भव्य कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार अमित देशमुख आणि खासदार डॉ. शिवाजी काळगे उपस्थित होते. यावेळी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर बोलताना देशमुख म्हणाले, "टिपू सुलतान यांचे विचार आणि त्यांचे कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लातूरमधील तरुणांमध्ये हे विचार रुजवण्यासाठी आवश्यक ती पुस्तके आणि साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे असून, यासाठी लातूर महानगरपालिका आणि मी स्वतः सर्वतोपरी सहकार्य करू." या कार्यक्रमादरम्यान कव्वाली सुरू असताना नोटांची उधळण झाल्याचा प्रकारही समोर आला असून, त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.