अंबाजोगाई (लातूर): अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून आज छाननीच्या दिवशी सर्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी एकमेकांवर आक्षेप घेतले मात्र हे सर्व आक्षेप बाद ठरले असून यातील भाजप बंडखोर उमेदवार शोभा लोमटे यांचा भाजप पक्षाचा अर्ज बी फॉर्म नसल्याने बाद ठरविण्यात आला असून त्यांचा अपक्ष अर्ज हा वैध ठरला आहे. आजच्या छाननी मध्ये नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असलेले उमेदवार राजकिशोर मोदी, नंदकिशोर मुंदडा यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. उमेदवारांना पक्ष चिन्ह निश्चित झाल्यानंतरच आता निवडणुकीचा धुरळा खऱ्या अर्थाने उडणार आहे.
निवडणूक जाहीर झाली नाम निर्देशनपत्रही दाखल झाले प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र, अजून निवडणुकीचा माहोल म्हणावा तसा तयार झालेला नाही. प्रचाराच्या तोफा अजून तरी बाहेर निघालेल्या नाहीत. त्यामुळे अंबाजोगाईत अद्याप निवडणुकीचे वातावरण असल्याचे दिसत नाही. यावेळी महाविकास व परिवर्तन आघाडी यासह शिवसेना (शिंदे गट) इतर पक्षांचे तसेच अपक्ष देखील उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांना जेव्हा पक्ष चिन्ह मिळेल, त्यानंतर प्रचाराला खरा वेग येणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल, त्यानंतर माघार आणि त्यानंतर छाननी होऊन निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल यानंतर येत्या २६ नोव्हेंबर रोजी पक्ष चिन्हांचे वाटप होणार आहे. चिन्ह वाटपानंतर खऱ्या अर्थान नगरपरिषद निवडणुकीतील रंगत पहायला मिळणार आहे. नंदकिशोर मुंदडा व राजकिशोर मोदी या दोन्ही गटांचे कार्यकर्ते, उमेदवार आपापल्या प्रभागात प्रचार करीत आहेत. पण प्रत्यक्षात प्रचार सभांचा नारळ मात्र वाढवलेला नाही. वास्तविक पाहता शेवटच्या पाच दिवसांतच प्रचारसभा, पदयात्रा, घरभेटी या प्रक्रियेला वेग येणार आहे. तो पर्यंत प्रभागात कोण आमनेसामने असणार व नगरसेवक पदासाठी कोणकोणत्या उमेदवारांना नेते ग्रीन सिग्नल देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.