Latur farming news pudhari photo
लातूर

Latur farming news : 'देवा, पाऊस पडू दे अन् भावाच्या शेतात सुगी बहरू दे..!

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीची भावाच्या शेतासाठी देवाकडे प्रार्थना

पुढारी वृत्तसेवा

मारोती बुद्रुक पाटील

अहमदपूर : रक्षाबंधन म्हटले की भावाच्या दीर्घायुष्याची, सुखाची आणि समृद्धीची प्रार्थना करणारी बहीण डोळ्यांसमोर येते. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी कुटुंबातील बहिणींच्या प्रार्थनेत भावाच्या संसारासोबत त्याच्या शेताचीही चिंता दिसून येत आहे. 'देवा, माझ्या भावाच्या शेतात चांगला पाऊस पडू दे... उभे पीक बहरू दे आणि त्याच्या कष्टाला यंदा फळ मिळू दे,' अशी आर्त विनवणी करीत बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधली.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता पावसाच्या सरींची प्रतीक्षा आहे. पिके उभी असली तरी त्यांना सध्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणीच्या ओवाळणीच्या ताटात भावाच्या सुखासोबत त्याच्या शेतासाठीची प्रार्थनाही आहे.

ग्रामीण भागातील बहिणी भावाच्या शेताशीही भावनिकरित्या जोडलेल्या असतात.भाऊ शेतात राबतो, बहिण सासरी असली तरी पेरणी झाली का, पाऊस झाला का, पीक कसे आहे, याची ती आवर्जून विचारपूस करते. यंदा मात्र पावसाची चिंता तिच्या मनात अधिक आहे.

  • शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टाचे गणित पावसावर अवलंबून असते. पिकाला वेळेवर पाऊस मिळाला तर घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि भविष्यातील अनेक स्वप्ने पूर्ण होण्याची आशा निर्माण होते. म्हणूनच यंदा बहिणीची भावाकडून महागड्या भेटवस्तूची अपेक्षा नाही. 'तुझ्या शेतात हिरवाई यावी, कष्टाचे सोने व्हावे आणि तुझ्या घरात सुखाची सुगी बहरावी,' एवढीच तिची इच्छा आहे. राखीच्या धाग्यासोबत बहिणीने भावाच्या मनगटावर जणू एक अदृश्य वचनही बांधले आहे 'तुझ्या सुखासाठी आणि तुझ्या शेताच्या सुगीसाठी माझी प्रार्थना सदैव तुझ्यासोबत आहे. 'आता बहिणीच्या या प्रार्थनेला पावसाची साथ मिळते का आणि शेतकऱ्यांच्या शेतात खऱ्या अर्थाने 'सुगी बहरते', याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT