Amit Chavan Death pudhari photo
लातूर

Latur Crime : पोलिस ठाण्यातच युवकाने जीवन संपवले

अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील घटना; दोषींवर कारवाई करा

पुढारी वृत्तसेवा

किनगाव : अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलिस ठाण्यात एका २१ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.23) समोर आली. अमित रमेश चव्हाण (रा. मरशिवणी, ता. अहमदपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून; संतप्त नातेवाईकांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

अमित चव्हाण याला एका प्रकरणात अहिल्यानगर येथून किनगाव पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रविवारी (२२ नोव्हेंबर) रात्री त्याला किनगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. पुढील पोलिस प्रक्रिया सुरू असतानाच; सोमवारी पहाटेच्या सुमारास ठाण्यातील एका खोलीत त्याने गळफास घेतल्याची बाब उघडकीस आली. या घटनेमुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच मरशिवणी येथील नातेवाईकांसह गावकऱ्यांनी किनगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला. यामुळे पोलिस ठाण्याच्या परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सखोल चर्चा केली.

चौकशीची मागणी

पोलिस कोठडीत अथवा ठाण्यात युवकाला मारहाण झाली का? त्याच्यावर काही मानसिक दबाव टाकण्यात आला होता का? तसेच ही घटना घडली तेव्हा कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नेमके कुठे होते? असे अनेक गंभीर प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी किंवा उच्चस्तरीय सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT