संग्राम वाघमारे
चाकूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रसिद्धी फलकावर मात्र अहिल्यादेवी होळकर यांचेच छायाचित्र नसल्याचा प्रकार समोर आला आहे. तहसील कार्यालयांसह विविध शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागात तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर लावण्यात आलेल्या प्रसिद्धी फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांची छायाचित्रे ठळकपणे झळकत असताना, ज्या अहिल्यादेवींच्या नावाने योजना सुरू करण्यात आली त्यांचे छायाचित्रच नसल्याने शेतकरी व नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत पीक कर्जमाफी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात या योजनेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
योजनेच्या जनजागृतीसाठी तहसील कार्यालये, शासकीय कार्यालये तसेच एसटी बसवर मोठमोठे प्रसिद्धी फलक लावण्यात आले आहेत. मात्र या फलकांवर योजनेशी संबंधित प्रमुख व्यक्तींची छायाचित्रे असताना योजनेला ज्यांचे नाव देण्यात आले आहे, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे छायाचित्र नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
यामुळे ‘जनेच्या नावाला न्याय कुठे?’असा सवाल उपस्थित केला जात आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे नाव केवळ योजनेला देऊन त्यांच्या कार्याचा आणि स्मृतीचा सन्मान होतो का, असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे. प्रसिद्धी फलक तयार करताना ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली नाही का, तसेच या फलकांना अंतिम मान्यता देताना संबंधित यंत्रणेने तपासणी केली होती का, असा सवालही उपस्थित होत आहे.
एकीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला जात असताना, त्यांच्या नावाने सुरू असलेल्या योजनेच्या अधिकृत प्रसिद्धी फलकावरच त्यांचे छायाचित्र नसणे हा विरोधाभास असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ही बाब केवळ अनवधानाने झालेली चूक आहे की प्रसिद्धी यंत्रणेच्या नियोजनातील त्रुटी, याचे स्पष्टीकरण शासनाने द्यावे, अशी मागणी होत आहे.
शेतकरी हिताच्या योजना राबविताना त्या योजनांच्या प्रसिद्धीतही अचूकता आणि संवेदनशीलता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन प्रसिद्धी फलकांमध्ये आवश्यक दुरुस्ती करावी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे छायाचित्र सन्मानपूर्वक समाविष्ट करावे, अशी मागणी शेतकरी व नागरिकांतून होत आहे.
अहिल्यादेवींचा फोटो लावून सन्मान करावा
महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केली, ही शेतकरी बांधवांसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र ज्या महापुरुषांच्या नावाने योजना राबविली जात आहे, त्यांचेच छायाचित्र तहसील कार्यालये व एसटी बसेसवरील प्रसिद्धी फलकांवर नसणे योग्य नाही. शासनाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक व बॅनरवर अहिल्यादेवींचे छायाचित्र लावून त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी मागणी सावता परिषदेचे लातूर जिल्हाध्यक्ष आत्माराम डाके यांनी केली आहे.