Agriculture Minister Kokate, Maratha community Warning NCP
लातूर, पुढारी वृतसेवाः राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना २५ जुलैपर्यंत बडतर्फ करावे अन्यथा राष्ट्रवादीच्या एकाही मंत्र्यास जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (दि.२१) येथे आयोजित पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आला. छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा सुरज चव्हाण व त्याच्या साथीदारांविरुध्द बीएनएस अंतर्गत १०९ चा गुन्हा नोंदवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
घाडगे यांना झालेली मारहाण व कृषिमंत्री काकोटे यांचे प्रकरण या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने सोमवारी सायंकाळी येथील औसा रोड विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांची कारकीर्द काळी आहे. त्यांनी यापूर्वी अनेकवेळा आक्षेपाहार्य वक्तव्ये केली आहेत.
कृषिखात्याला ओसाड गावची पाटीलकी संबोधले आहे. शेतकरी कष्टकऱ्यांचा अवमान केला आहे. शिवाय त्यांना एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षा केली आहे. हे सारे लख्ख असताना गुन्हेगारांना तुम्ही मंत्री केलेच कसे ? असा सवाल समाजबांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना केला व कोकाटे यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, असे सांगत यासाठी २५ जुलै ही डेडलाईन त्यांनी दिली.
याशिवाय लातुरात राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण व त्याच्या साथिदारांनी केलेला हल्ला हा घाडगे यांना जीवे मारण्यासाठीच होता त्यामुळे त्यांच्यावर १०९ कलमांतर्गत गुन्हा नोंद करावा तसेच या मारहाणीच्या चित्रफिती तयार करून दहशत माज-वणाऱ्यांवरही याच कलमाखाली गुन्हे दाखल करावेत. सुरज चव्हाण हा एका शासकीय समितीवर असून त्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी त्याची हकालपट्टी करावी अशी मागणी केली.
लातूर येथे छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकरवी झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे खरे सूत्रधार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेच असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने यावेळी केली.