Adherence to traffic rules is essential to prevent deaths in accidents: District Collector
लातूर, पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक व्यक्तीचा जीव मौल्यवान असतो, मात्र वाहतूक नियमांचे पालन न केल्याने आपण आपला आणि इतरांचाही जीव धोक्यात टाकतो. देशात जवळपास एक ते दीड लाख व्यक्तींचा दरवर्षी अपघातात मृत्यू होतो, यामध्ये सुमारे दहा ते अकरा टक्के मृत्यू आपल्या राज्यात होतात.
हे मृत्यू टाळण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. विशेषतः युवा वर्गाने यासाठी पुढाकार घ्यायला हवा, युवक-युवतींनी वाहतूक नियमांचे पालन करून इतरांनाही त्याबाबत जागरूक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
लातूर जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२६ चे उद्घाटन जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर, सा. वां.. अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, रा.पर. महामंडळाचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रस्ते सुरक्षा विषयक माहितीपुस्तिका, भिंतीपत्रिका, जनजागृती फलकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रत्येक व्यक्तीने नववर्षानिमित्त वाहतूक नियमांच्या पालनाचा संकल्पकरावा. आपला जीव हा सर्वात मौल्यवान आहे.
केवळ दंड वाचविण्यासाठी नव्हे, तर स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचविण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. वाहने सावकाश चालवा. रस्ता सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करण्याची संवेदनशीलता आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे म्हणाल्या. अपघातामध्ये मृत्यू होणेदुर्दैवी बाब असून, मृत्यूमुळे होणारी हानी भरून न निघणारी आहे.
अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करावे. दुचाकी चालवतानाहेल्मेट आणि चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करणे आवश्यक आहे. असे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले. व्यंकटेश गिरवलकर यांनी अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी वाहतुक नियमांचे पालन करण्याचा संकल्प करावा. पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देवू नयेत. त्यामुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी पालकांवर येते, असे सांगितले. प्रास्ताविक मोटार वाहन निरीक्षक अभिजीत रेळे यांनी केले. अपघातग्रस्तांना मदत करणारे दयाराम जगन्नाथ सुडे, गणेश गिराम, आबासाहेब शिंदे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.