Accidents increase on Bothi Road
चाकूर, पुढारी वृत्तसेवाः चाकूर शहरातील बोथी रोडवर वाहनांची बेशिस्त पार्किंग आणि विरोध दिशेने येणाऱ्या वाहनांच्या चुकीमुळे दररोज अपघात होत असून याला आळा कधी बसणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
चाकूर शहरात बेशिस्त वाहतुक आणि चुकीच्या पार्किंगमुळे दिवसेंदिवस अपघात वाढले आहेत. शुक्रवारी बाजार दिवशी गर्दीतून मोटार सायकलस्वार आणि चारचाकी वाहने यांना कायद्याची भीती राहिली नाही. चक्क ते विरोध दिशेने, वाहतुकीचे नियम मोडून बेशिस्त वाहने चालवतात त्यामूळे अपघात होत आहेत.
शनिवारी दुपारी एक मोटार सायकलस्वार पलीकडच्या दिशेने आलिकडच्या साईडला अचानक येताच विरोध दिशेने येणाऱ्या मोटार सायकलला रास्ता ओलांडतांना समोरासमोर धडक झाली. या अपघातात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. या घटनेत दुचाकीस्वार वीस ते तीस फूटापर्यंत घसरत जाऊन दुभाजकास जावून धडकला. यामुळे मोठी घटना टळली गेली.
मात्र चुकीच्या ठिकाणी उभी केलेली दुचाकी, चारचाकी वाहने, रस्त्याच्या कडेला थांबलेल्या आटोरिक्षा यांच्या अडथळ्यांमुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. यामुळे थेट अपघात होत आहेत. बोथी रोडवर आत्तापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे अनेकजन किरकोळ जखमी झाले आहेत.
या परिसरातील व्यापारी, नागरिक रस्त्यावर एकत्र येवून चुकीच्या पार्किंगविरुद्ध संताप व्यक्त करीत आहेत. बोथी रोड हा शहरातील प्रमुख वाहतुकीचा मार्ग आहे. येथे दिवसभर मोठी व्यापारी, नागरिकांची वर्दळ असते. याठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने चक्क रस्त्याच्या मध्यभागी उभी केल्याचे नियमित आढळून येते.
व्यापाऱ्यांना दररोजचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. वाहनचालकांनी नियम पाळण्याची सवयच उरलेली नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. यांच्यावर आळा, शिस्त कधी बसणार याचीच चर्चा नागरिक करीत आहे.
रस्त्यावर थांबणाऱ्या रिक्षा, दुचाकी आणि चारचाकीमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. यामुळे वाहनास रस्ता अरुंद पडल्यामुळे अपघातांच्या घटना वाढत आहेत. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.