Abhijit Dipke : शाळा दर्जेदार असतील तरच देश विश्वगुरू होईल file photo
लातूर

Abhijit Dipke : शाळा दर्जेदार असतील तरच देश विश्वगुरू होईल

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शाळेच्या पाहणीत अभिजीत दीपके यांची शासन व्यवस्थेवर तोफ

पुढारी वृत्तसेवा

Abhijit Deepke: The country will become a 'Vishwa-Guru' (global leader) only if schools are of high quality

लातूर, पुढारी वृतसेवा : देश स्वतंत्र होऊन ८० वर्षे उलटली असली तरी देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि चांगल्या शाळा देता येत नसतील, तर देश विश्वगुरू कसा बनेल आणि अर्थव्यवस्था वैश्विक भरारी कशी घेईल, असा सवाल सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी केला.

देश घडवायचा असेल तरशाळा आणि शिक्षणाचा दर्जा उत्तम असणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करत त्यांनी गुरुवारी शासन व्यवस्थेवर टीका केली. लातूर शहरातील सम्राट चौक परिसरातील महापालिकेच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शाळा क्रमांक २६ ला दीपके यांनी गुरुवारी दुपारी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी शाळेची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिक्षण हे सर्वांगीण उन्नतीचे प्रवेशद्वार आहे. मात्र ज्या शाळांमधून शिक्षण दिले जाते, त्यांचीच अवस्था खराब असेल तर मुले कशी शिकणार आणि शिक्षक कसे शिकवणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

लातूर जिल्हा दौऱ्यात पाहिलेल्या जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या एकाही शाळेची स्थिती समाधानकारक नसल्याचे सांगत ही शासन व्यवस्थेची अपयशाची बाब असल्याचा आरोप त्यांनी केला. पीएम फंडाचा पैसा पडून असून त्यावर व्याज वाढत आहे. या पैशाचे काय करायचे, असा सवाल करत हा निधी शिक्षणासाठी खर्च करावा, अशी मागणी त्यांनी केली.

शाळेत प्रवेश करताच दीपके थेट वर्गात गेले. सतरंजीवर बसलेली मुले, पावसाळ्यात गळणारे छत, स्वच्छतागृहात पाण्याचा अभाव, इमारतीची दुरवस्था आणि परिसरातील अस्वच्छता पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. शाळेत एक मुख्याध्यापक आणि एक शिक्षिका कार्यरत असल्याचे निदर्शनास आले.

एका शिक्षिकेवर अध्यापनाचा एवढा भार टाकणे योग्य नसल्याचे सांगत शिक्षकांची संख्या वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दीपके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप केले. शाळेत दूरचित्रवाणी संच आणि सीसीटीव्ही सुविधा असल्या तरी आवश्यक संख्येने शिक्षक नसतील तर या सुविधांचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी केला.

वर्गशिक्षिकेशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या. शाळेला संरक्षक भिंत नसल्याने परिसरात अनेकांकडून उपद्रव होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. संरक्षक भिंत उभारून शाळेच्या सुरक्षिततेची व्यवस्था करावी, अशी मागणी त्‍यांनी केली.

अन् दीपके संतापले

पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एका विद्यार्थ्यान आपण या शाळेचे नसून दुसऱ्या शाळेचे असल्याचे सांगितले. यावर दीपके यांनी नाराजी व्यक्त केली. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शाळेत आणले जात असल्यास ही गंभीर बाब असल्याचे सांगत त्यांनी संबंधित मुख्याध्यापिकेला जबाबदार धरून निलंबनाची मागणी केली.

त्यांनी तत्काळ लातूर महापालिकेच्या उपायुक्त वसुधा फड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधित मुख्याध्यापिकेबाबत तक्रार केली. दरम्यान, मुख्याध्यापिका महादेवी चिकाटे यांनी संबंधित मुले आपण शाळेत आणली नव्हती, असे स्पष्टीकरण दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT