जळकोट : बैल पोळा सण (Bail Pola 2024) असल्याने ढोरसांगवी (ता. जळकोट ) येथील तरुण रविवारी बैल धुण्यासाठी गावातील ओढ्यावर गेला होता. मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ओढ्याला आलेल्या पाण्यात तरुण दोन बैलांसह वाहून गेला. नरेश अशोकराव पाटील (वय २४) असे या तरुणाचे नाव आहे. थोड्या अंतरावर दोन्ही बैल जिवंत आढळले असून तरुणाचा शोध सुरू आहे.
बैल जोडी धुण्यासाठी घेऊन गेलेला नरेश बराच वेळ घरी परत आला नसल्याने त्याचा शोध घेण्यासाठी नातेवाईक गेले होते. त्यांना त्याचे कपडे, मोबाईल, चप्पल हे ओढ्याजवळ आढळून आले. त्यानंतर त्याचा शोध सुरू केला असता तिथून काही अंतरावर दोन्ही बैल मिळून आले. नरेश याचा शोध सुरू आहे. आज एनडीआरएफ पथकामार्फत त्याचा शोध घेण्यात येणार आहे, असे सरपंच सोक्षा दिलीप सोनकांबळे यांनी सांगितले.