सातारा : पुढारी वृत्तसेवा
दुसर्या महिलेशी अनैतिक संबंध ठेवायचे असतील तर घरी यायचे नाही. तसेच आईने व सासूनेही महिलेचा नाद सोड असे म्हटल्याच्या कारणातून सातारा पोलिस दलातील पोलिसाने तिघींना मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केली. दरम्यान, पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या घटनेने ‘एक पोलिस दोन बायका अन् फजिती ऐका’, अशी चर्चा रंगली आहे.या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस पत्नीने पती विरुध्द तक्रार दिली आहे. मारहाण, शिवीगाळ, दमदाटीची घटना दि. 31 ऑगस्ट रोजी घडली आहे. पोलिस कुटुंबीयासोबत सातार्यातील यादोगोपाळ पेठेत राहत आहे.
प्रतिबंधात्मक कारवाई होणार...
अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला पोलिस सातारा उपविभागीय क्षेत्रातील पोलिस ठाण्यामध्ये कर्तव्य बजावण्यास आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात एनसी दाखल झाल्याने आता त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.
दाखल घटनेबाबतचा अहवाल तयार करून तो वरिष्ठ अधिकार्यांना पाठवला जाईल. यानंतर पोलिसावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.
पोलिस पत्नीने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, पोलिस असलेल्या पतीचे एका परस्त्रीसोबत अनैतिक संबंध आहेत. यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत आहेत. ‘परस्त्रीसोबत संबंध ठेवायचे असतील तर तू माझ्याकडे येऊ नको,’ अशी तंबी पत्नीने पोलिसाला दिली. या कारणातूनही वाद झाला. दोघा पती-पत्नीमधील हा वाद कुटुंबामध्ये सर्वांना समजला. यामुळे पोलिसाला समजावून सांगण्यासाठी चर्चेला ऊत आला.
पोलिसाच्या आईने व सासूनेही मध्यस्थी करत ‘परस्त्रीचा नाद सोडण्याचा सल्ला दिला.’ या सर्व घटनेनंतर पोलिसाचा पारा चढला व त्याने थेट आई व सासूला मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली. यामुळे अधिकच तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसाची समजूत काढण्याचा अधिक प्रयत्न केला असता त्याने ‘आता मी त्या बाईला घरी आणणारच. तुला बघून घेतो,’ असे म्हणत धमकी दिली. यामुळे पोलिसाची पत्नी, आई व सासू तिघी हतबल झाल्या. पोलिसाच्या वागण्यामुळे पोलिस पत्नीने थेट शाहूपुरी पोलिस ठाण्याचे दार ठोठावले. पोलिस ठाण्यात तक्रार सांगितल्यानंतर उपस्थित पोलिसांनीही कपाळावर हात मारून घेतला. तक्रार ऐकून संबंधित पोलिसाविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.