जळकोट : शेताजवळील पाझर तलावात बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता पुत्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १७) शिवाजीनगर तांडा (ता. जळकोट) येथे घडली. तिरुपती बाबुराव पवार (वय ४२) आणि नामदेव तिरुपती पवार (वय १२) रा. माळहिप्परगा असे मृत पिता-पुत्राचे नाव आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच घटना घडल्याने माळहिप्परगा व पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.
शिवाजीनगर तांडा (माळहिप्परगा ) येथील २२० केव्ही उपकेंद्राजवळ तिरुपती पवार यांची शेती आहे. मंगळवारी तिरूपती मुलगा नामदेव याला घेऊन शिवाजीनगर तांडा येथील पाझर तलाव क्र १ वर बैल धुवायला गेले होते. यावेळी पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला. तिरुपती पवार यांना नामदेव हा एकुलता एक मुलगा होता. दोघांच्याही मृत्यूने पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिरुपती पवार यांच्या पश्चात पत्नी, दिव्यांग वडील, ४ मुली असा परिवार आहे.