Renapur crop damage pudhari photo
लातूर

Renapur crop damage : रेणापूर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या; पिके सुकू लागली

सोयाबीनचा पेरा अधिक; दुबार पेरणीचे संकट, शेतकरी धास्तावले

पुढारी वृत्तसेवा

रेणापूर : रेणापूर तालुक्यात १५ जुलै अखेर खरिपाची जवळपास ७५ टक्के पेरणी झाली आहे त्यात सोयाबीनच्या सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरणी होत आहे. नगदी पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते त्यामुळे बाजारात भले भाव कमी मिळत असला तरी शेतकरी सोयाबीन याच पिकाला पर्यायी पीक म्हणून प्राधान्य देत आहेत.

दरवर्षी या पिकाच्या क्षेत्रात वाढ होत असून या वर्षी ३३ हजार १४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्यामुळे सोयाबीनसह इतर सर्वच खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. ती सुकुन जात आहेत. त्यातच सोयाबीन न उगवल्याच्याही काही तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

दर वर्षी शेतकऱ्यांना किमान पंधरा कोटी रुपयांचे सोयाबीन बियाणे बाजारातून खरेदी करावे लागते. यावर होणारा कोट्यावधींचा खर्च कमी करता यावा. यासाठी बहुतांश शेतकरी स्वतःच्या शेतातील सोयाबीनपासुन गुणवत्तापूर्ण उत्पादीत झालेले सोयाबीनच्या बियाणाचा वापर करीत होते परंतु या वर्षी अती पावसामुळे सोयाबीन भिजल्याने शेतकऱ्यांना घरचे सोयाबीन पेरता आले नाही. सोयाबीनच्या निकृष्ट बियाणाचा कांही शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

यंदा सोयाबीनच्या उगवण क्षमतेबाबत अनेक शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत त्याबाबत कृषी विभागाचे अधिकारी , कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करीत आहेत. १९ डिसेंबर १९६६ ला देशात बियाणे कायदा तयार झाला. १९६८ ला त्याची नियमावली अस्तीत्वात आली. त्यानंतर १९८३ मध्ये स्वतंत्र बियाणे आदेश काढण्यात आले.

असे असतांनाही शेतकऱ्यांची नामांकित बियाणांच्या कंपण्यांकडून फसवणुक होत असेल तर मग असे कायदे करून त्याचा उपयोग काय ? असा सवाल शेतकऱ्यांमधुन उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांना खराब बीयाने दिले गेले तर संबंधीत बियाणे उत्पादक, विक्रेते , इतर वितरकांकडून ग्राहक संरक्षण कायद्यानुसार नुकसान भरपाईची तरतुद आहे परंतु आजपर्यंत किती शेतकऱ्यांना उत्पादनाच्या तुलनेत नुकसान भरपाई मिळते ? हा ही एक प्रश्नच आहे.

  • रेणापूर तालुक्यात दर वर्षी किमान ३७ ते ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होते. याही वर्षी ३३ हजार १४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. एका हेक्टरला अंदाजे ७० ते ७५ किलो बियाणे लागते. या वर्षी किमान २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे पेरणीसाठी लागले आहे . यासाठी एका क्विंटलला किमान साडेपाच हजार रुपये लागतात . त्याची किंमत होते १५ ते १६ कोटी. बाजारात सर्वसाधारणपणे ३० ते ३५ टक्के शेतकरी बाजारातुन नविन बियाणाची खरेदी करतात. तर ६० ते ६५ टक्के शेतकरी (१८ ते १९ हजार क्विंटल ) घरच्या बियाणांचा वापर करतात. हमीभावाने याची किंमत होते ७ ते ८ कोटी.तर बाजारातील किंमत होते १० ते ११ कोटी. यावर्षी पावसाने उघाड दिल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी सर्वच शेतकऱ्यांनी जर घरच्याच सोयाबीन बियाणांचा वापर केला तर वर्षाकाठी शेतकऱ्यांची किमान पंधरा ते सोळा कोटी रुपये बचत होतील असा अंदाज आहे.दरवर्षी बाजारात सोयाबीन बीयानाच्या किंमती वाढत आहेत. महागामोलाचे बीयाणे खरेदी करून पेरणीसाठी मोठा खर्च करावा लागतो. अनेक वेळा बीयाणाची उगवण होत नाही.शेतकऱ्यांना दुबार तीबार पेरण्या कराव्या लागतात.

  • रेणापूर तालुका कृषी कार्यालयाच्या पेरणी अहवालानुसार यावर्षीच्या खरीप हंगामात ७५ टक्के पेरण्या झाल्या आहेत ( १३ जुलै अखेर ) त्यात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा झालेला आहे. पीक निहाय झालेली पेरणी अशी , सोयाबीन - ३३ हजार १४१ हेक्टर , तुर - एक हजार ७१९ हेक्टर , मुग - २४० हेक्टर, उडीद - १११ हेक्टर , मका - ५७ हेक्टर , खरीप बाजरी - ३४ हेक्टर , तीळ - ९ हेक्टर , कापूस - ३२ हेक्टर तर भुईमुग - २ हेक्टर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT