Chandrapur News : निकृष्ट सोयाबीन बियाण्याचा फटका; दोनदा पेरणी करूनही उगवण नाही

चारगावातील शेतकऱ्याची कृषी विभागाकडे तक्रार; प्रत्यक्ष पाहणी व पंचनामा, नुकसानभरपाईची मागणी
Chandrapur News
कृषी विभागाच्या पथकाने शेताची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला
Published on
Updated on

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील चारगाव येथील एका शेतकऱ्याला निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यामुळे मोठा आर्थिक फटका बसल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन वेळा पेरणी करूनही अपेक्षित उगवण न झाल्याने संबंधित शेतकऱ्याने कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली असून विभागाने शेताची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला आहे. संबंधित बियाणे कंपनीवर कारवाई करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

चारगाव येथील शेतकरी शरद बापूराव भोगेकर यांनी शिव एग्रो केंद्र, चारगाव येथून सोयाबीन बियाणे खरेदी करून १३ जून रोजी पहिली पेरणी केली होती. मात्र, अपेक्षित उगवण न झाल्याने त्यांनी २६ जून रोजी त्याच शेतात पुन्हा पेरणी केली. दुसऱ्या पेरणीनंतरही उगवण अत्यल्प झाल्याने बियाण्याच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाला.

यानंतर शेतकरी भोगेकर यांनी कृषी विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत तालुका कृषी अधिकारी रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या पथकाने शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पिकांची स्थिती, उगवण टक्केवारी तसेच झालेल्या नुकसानाची नोंद घेऊन पंचनामा करण्यात आला.

पाहणीदरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिणखेडे, तालुका कृषी अधिकारी रवी राठोड, आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. इमडे, मंडळ कृषी अधिकारी काळे, कृषी सहाय्यक तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. कृषी विभागाकडून तयार करण्यात आलेला पंचनाम्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. संबंधित बियाणे कंपनीच्या बियाण्याच्या गुणवत्तेची तसेच पुरवठा साखळीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी शरद बापूराव भोगेकर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news