38 thousand 944 hectares of area affected in Renapur taluka
विठ्ठल कटके
रेणापूर : रेणापूर तालुक्यात गुरुवारी (दि. २८) पाच महसूल मंडळांत १०६.४ मि.मी. पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वच लहान मोठ्या ओढ्यांना पूर येऊन तालुक्यातील ७७ गावांच्या ४४ हजार २०० शेतकऱ्यांच्या ३८ हजार ९४४ हेक्टर क्षेत्रा-वरील क्षेत्र बाधीत झाल्याचा प्राथमिक अंदाज रेणापूर तालुका कृषी विभागाने व्यक्त केला आहे शेतात पाणी घुसून पिकांसोबतच शेतातील इतर साहित्यांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी फिरले आहे.
रेणा नदी दुथडी भरून वाहत आहे. मोटेगावच्या ओढ्याने उग्र स्वरूप धारण केल्यामुळे येथील नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गरज पडल्यास येथील नागरीकांना स्थलांतरीत करावे लागेल त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार कदम यांनी दिली. रेणा धरणांच्या साठवण क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असून गुरुवारी (दि. २८) सकाळी आठ वाजल्या पासून धरणाचे सहा दरवाजे २० सें.मी.ने उघडण्यात आले आहेत.
रेणा नदीपात्रात ३७५५.२१ क्युमेक्सने (१०६.३५ क्युसेकने) पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदी काठच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली आले आहे. दिलीप पाटील, संजीवनी पाटील, गोविंद पाटील, रेवती पाटील यांच्या शेतात सध्या आठ फूट पाणी साचल्याने शेतातील कडबा, शेती औजारे, इलेक्ट्रीक मोटार, पाईप, गुळी, ठिबक व तुषार संच आदी साहित्य नदीच्या पुरात वाहन गेले आहे. अशीच स्थिती नदीकाठच्या शेकडो शेतकऱ्यांची झालेली आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्वच पिके पाण्याखाली आली असून लहान-मोठे ओढे भर भरून वाहत असल्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. धरण-ाखाली घनसरगाव, रेणापूर, जवळगा व खरोळा हे चारही बॅरेजेस तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या शेकडो एकरात पाणी घुसून पीक पाण्यात बुडाली आहेत.
शुक्रवारी (दि.२९) आ. रमेशअप्पा कराड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मोटेगाव, रेणापूर, शेलू जवळगा, बामणी परिसरातील पीक परिस्थितीची पाहणी करून तातडीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले. अनेक नागरिकांची पावसामुळे घरे पडली आहेत. तहसील कार्यालयाच्या तळमजल्यात पाच ते सहा फुटांपर्यंत पाणी साचल्याने याठिकणचे फर्निचर व इतर साहित्य सध्या पाण्यात आहे. हे पाणी बाहेर काढावे कसे असा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे. तसेच न्यायालयासमोर साचलेल्या पाण्याला चर खोदून वाट करून देण्यात आली आहे.
तालुक्यात २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या वादळीवारे, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने ७६ गावांतील ४४ हजार २०० शेतकऱ्यांच्या शेतातील जिरायती क्षेत्र ३८ हजार ९३७ हेक्टर तर बागायती ७ हेक्टर क्षेत्रावरील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल शुक्रवारी वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे.नितीन कांबळे, तालुका कृषी अधिकारी रेणापूर