किल्लारी भूकंपग्रस्तांची घरे  
लातूर

लातूर : विसंगत घरकुलांतील घुससमट ३१ वर्षानंतरही कायम

भीतोपोटी पत्र्यांच्या शेडमध्ये निवास

पुढारी वृत्तसेवा
शहाजी पवार

लातूर : भूकंपाने जीवनात अंधार आणला, वर्षानूवर्ष राबून कमावलेले, उभारलेले सारे काही क्षणात मातीमोल झाले, जीवाभावाची माणसे गेली. उघड्यावर पडलेल्या आम्हा अभाग्यांना सरकारन- स्वयंसेवी संस्थांनी , घरे दिली परंतु आमच्यासह आमच्या जित्राबाला हवा असलेला निवारा ,मजबुती अन् समाधान तिथे नाही. भयापोटी जागत अन् काळजाच्या जखमा कुरवाळत आम्ही इथे कसाबसा काळ कंठत आहोत…. सर्व भूकंपग्रस्तांची आंतरीक खदखद व्यक्त करणारी किल्लारीच्या गजाभाऊंची ही जखम अजूनही ओली आहे.

किल्लारीच्या भूकंपाला आज ३१ वर्ष होत असून या पार्श्वभूमीवर तेथील गावकऱ्यांची खदखद जाणून घेत असताना ते म्हणाले ३० सप्टेबर १९९३ च्या भूकंपातून बचावलेल्यांना निवारा देण्यासाठी तत्कालीन सरकारने घरे उभारली. औसा अन उमरगा तालुक्यात ५५ हजार घरे बांधण्यात आली. घरे दिल्याने सरकारला कर्तव्यपूर्तीचा आनंद झाला तथापि घरात राहण्याचे समाधान घरधन्यास अन् त्याच्या परिवारास लाभले नाही. वास्तवाचा विचार न करता अन गावकऱ्यांच्या गरजा विचारात न घेता घाईगडबडीत झालेले हे पुनर्वसन भूकंपग्रस्तासाठी नित्याची डोकेदुखी झाली आहे. वास्तू उभारताना तिची उपयोगिता केंद्रस्थानी असणे गरजेचे असते. घरापुढे ओटा, घरासमोर अंगण, घरामागे परस, बैठकीसाठी ढेळज, धान्यासाठी लादणी, गुरासांठी गोठा, राहण्यासाठी खोल्या असे कृषिसंस्कृतीपूरक घर भुकंपग्रस्तांना अपेक्षित होते. तथापि हा गृहआरखडा सरकारने पा‌‌ळला नाही. उत्पन्न वाढले व कुटूंब विस्तारले की माणसे घराचाही विस्तार करतात, याचाही विचार झाला नाही. अनेक ठिकाणी रेडीमेड भिंती उभारुन तयार छत टाकून घरे उभारली गेली. गुबाळला तर घुमटाकार घरे बांधण्यात आली. या घरांना फडताळे नाहीत, उन्हाळ्यात उकाडा अन हिवाळ्यात गारठा असह्य होतो. या घरावर बांधकाम कसे करायचे? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

विशेष म्हणजे बांधलेल्या बऱ्याच घरांनी दोन-चार वर्षांत पाणी टपकू लागले, भिंती तडकल्या. हे घर अंगावर पडेल अन आपला जीव जाईल, अशी भीती वाटत असल्याने अनेकांनी घरापुढे असलेल्या थोड्या-थोडक्या जागेत पत्र्याचे शेड टाकून त्यात आपली पथारी पसरली आहे. घरापासून कोसो दूर असलेल्या शेतावर जनावरे ठेवली आहेत तिथे जागा नसल्याने पशुधन चोरी जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते. पुनर्वसन करताना तेथील लोकजीवनाला पुरक असलेल्या वास्तूसिध्दांताला डावलल्याचा हा परिणाम आहे . पूर्वीच्या घराची रचना शेजारपण जपनारी. नजरेत असणारी, आधार देणारी अन गावपण जपनारी होती. आता ती आठवणी पुरतीच राहिल्याची रुखरुख भूकंपग्रस्तांत आहे.

अन् बेकरही परतले

विश्वविख्यात वास्तू शिल्पी लॉरी बेकर हे १० आक्टोबर १९९३ ला लातूरला आले होते. भूकंपग्रस्तांशी संवाद साधून त्यांना कशी घरे हवी आहेत, याची त्यांनी खातरजमा केली होती. त्यानुसार त्यांनी घरांचा आराखडाही तयार केला होता. त्यांच्या घराचे बांधकाममुल्य १८० रुपये प्रति स्केवर फुट होते तर बिल्डरांच्या घराचा हा भाव २५० रुपये स्कवेअर फुट होता. परंतु बिल्डर लॉबीचीच सरशी झाली अन बेकरांना परतावे लागल्याचा प्रसंग पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी सांगितला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT