लातूर : जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी आणि दहा पंचायत समितीच्या 118 जागांसाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. याकरिता दाखल झालेल्या उमेदवारी अर्जंपैकी मंगळवारी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या मैदानातून 210 तर पंचायत समितीच्या मैदानातून 354 अशा एकूण 564 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आता जिल्हा परिषदेसाठी 242 तर पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात 419 उमेदवार उभे आहेत.
लातूर जिल्हा परिषदेसाठी पूर्वी 58 जागा होत्या. मात्र मतदार संघाच्या पुनर्रचनेत निलंगा तालुक्यात एक प्रभाग वाढल्याने आता 59 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवारी उमेदवारी मागे घेण्याची तारीख होती. त्यानुसार जिल्हा परिषद गटामधून 210 जणांनी माघार घेतली आहे.
यामध्ये निलंगा तालुक्यातील तांबडा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसतर्फे उमेदवारी दाखल केलेल्या संजना चौधरी यांनी तीन दिवसापासून बेपत्ता झाल्याच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी पोलीस बंदोबस्तात दाखल होऊन उमेदवारी मा घेतल्याने मोठा चर्चेचा विषय झाला होता. आता जिल्हा परिषदेसाठी 242 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक सुरू केली असून भाजपने 11 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेसोबत युती केल्याचे वृत्त आहे. दरम्यान 10 पंचायत समित्यामध्ये एकूण 118 जागांसाठी 419 उमेदवार आमने-सामने उभे टाकले आहेत. काल मंगळवारी 354 जणांनी उमेदवारी माघार घेतली. त्यामुळे इथेही काँग्रेस व भाजप राष्ट्रवादीमध्ये अटीतटीच्या लढती होणार आहेत.