लातूर,पुढारी वृतसेवा : चारित्र्यावर संशय घेत सतत मारहाण करणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच त्याचा खून केला व संशय येऊ नये म्हणून पतीच्या नात्यातील एका नातेवाईकानेच त्याला संपवल्याचा बनाव करीत पोलिसांत फिर्याद दिली. तथापि चाणाक्ष पोलिसांनी तिची पोलखोल केली. तिच्यासह या कटात सहभागी आरोपींना अटक करण्यात आली आहे. पूजा हनमंत कटारे असे तिचे नाव आहे.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस ठाणे गातेगाव हद्दीमधील जोडजवळा येथिल एका महिलेने १८ जुलै रोजी शेताच्या वादातून तिच्या पती हनमंत कटारे याचा नात्यातील एका व्यकतीने डोक्यावर कोयत्याने मारून खून केल्याची तक्रार गातेगाव पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून गुन्हा नोंद करुन पोलिसांनी फिर्याद मध्ये नमूद आरोपीला अटक केली होती.तथापि गुन्ह्याच्या कारणाची व इतर बाबींचा तपास करीत असताना मोठ्या प्रमाणात विसंगती दिसत होती. यामुळे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदर खुनाच्या गुन्ह्याचा बारकाईने तपास करण्या संदर्भात पोलीस ठाणे गातेगाव व स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते.
पथकाने सदर गुन्ह्यातील अटक आरोपी, फिर्यादी, साक्षीदार, यांच्याकडे अतिशय बारकाईने, विविध मुद्द्यावर सखोल विचारपूस केली. तेव्हा फिर्यादी,अटक आरोपी, साक्षीदार यांच्या सांगण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे समोर आले. त्यावरून फिर्यादीला विश्वासात घेऊन विचारपूस केली तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे न सतत मारहाण करीत असल्याने तिने, तिची आई व दोन पुरुषाच्या मदतीने पतीचा खून केल्याचे व तो खून दुसऱ्याच व्यक्तीने केल्याचा बनाव रचल्याचे कबूल केले. यावरून पोलीस पथकाने राजेंद्र विद्याधर नितळे, (वय 54, रा. बोरगाव),दत्तात्रय नागनाथ लोंढे, ( वय 50, रा.मुरुड),निर्मला पांडुरंग दयाळ, (वय 50 , रा.मुरुड),पूजा हनमंत कटारे(वय 30, रा. जोडजवळा) यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास गातेगाव पोलीस करीत आहेत.