worm infestation of maize crop
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना नुकल्याच पडलेल्या पावसाने तारले आहे. दुसरीकडे मका पिकावर पडलेल्या अमेरिकन लष्करी अळीने मका उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे.
मकाला बाजारात असलेली मागणी व चाऱ्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांची मका लागवडीला पसंती आहे. गेल्या काही वर्षांत हे क्षेत्र वाढत आहे. मात्र लष्करी अळीने मका उत्पादक शेतकऱ्यांचा पीक संरक्षण खर्च वाढतच आहे. त्यात उत्पादनावरही परिणाम होत असतो.
यंदाही लष्करी अळी प्रादुर्भावाने भोकरदन तालुक्यात डोके वर काढल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. पंधरवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनर्रागमन झाले. त्यामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र मका पीक अमेरिकेन लष्करी अळीच्या हल्ल्यात नेस्तनाबूत होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे.
शेतकरी गेल्या दशकात टप्प्याटप्प्याने मका लागवडीकडे हळूहळू वळला आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव उत्पादनाच्या अंगाने अडचणीचा ठरत आहेत. २०२० मध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव पेरणीच्या ९० टक्के क्षेत्रावर होता. त्या वेळी प्रतिबंधात्मक व संरक्षणात्मक उपाययोजना करूनही प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. यावर रासायनिक व जैविक फवारण्या करून प्रादुर्भाव नियंत्रणात आणला होता.