Women take an aggressive stance against the illegal sale of liquor!
तळणी, पुढारी वृत्तसेवाः मंठा तालुक्यातील शिरपूर येथे अवैध देशी व गावठी दारूविक्रीविरोधात महिलांनी थेट रणशिंग फुंकले आहे. महिलांनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर केला. एवढ्यावरच न थांबता महिलांनी एकत्र येत डीवायएसपी रामेश्वर रेंगे यांच्यापुढे दारूमुळे कुटुंबांमध्ये निर्माण झालेल्या समस्यांचा पाढा वाचून अवैध दारूविक्री करणाऱ्यांची नावेही महिलांनी थेट पोलिसांच्या हाती सोपविली.
अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी महिलांनी यापूर्वी सरपंच शिवाजी थोरवे यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानंतर सरपंचांसह गावातील प्रमुख नागरिकांनी दारू विक्रेत्यांची बैठक घेऊन बेकायदेशीर धंदे बंद करण्याची कडक सूचना दिल्या. या समजावणीनंतर काहींनी विक्री बंद केली; मात्र एक-दोन जणांकडून छुप्या पद्धतीने दारूविक्री सुरूच राहिल्याचा आरोप महिलांनी केला आहे. यामुळे महिलांचा संयम सुटला आणि अखेर त्यांना थेट पोलिस प्रशासनाला गावात बोलवावे लागले.
मंगळवार, दि. २५ रोजी डीवायएसपी रामेश्वर रेंगे, मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे यांनी शिरपूर येथे भेट देऊन महिलांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी महिलांनी अवैध दारुविक्री संदर्भात आपली समस्या मांडली. पोलीस यंत्रणेकडे स्वतःचे माहितीदार आणि गुप्तहेर जाळे असतानाही अवैध धंद्यांकडे डोळेझाक का झाली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सहज उपलब्ध होणाऱ्या अवैध दारूमुळे ग्रामीण भागातील युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असल्याची चिंता व्यक्त केली. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंब व तरुण पिढ्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे. आणि सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. संबंधित दारू विक्रेत्यांवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल.- रामेश्वर रेंगे, उपविभागीय पोलिस अधिकारी, परतूर