Jamun tree disappearing pudhari photo
जालना

Jamun tree disappearing : तालुक्यात गावरान जांभूळ झाले दुर्मिळ

चवीसोबत आरोग्याचा नैसर्गिक ठेवा हरवण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

घनसावंगी ः उन्हाळ्याच्या अखेरीस आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला गावोगावी रस्त्याच्या कडेला, शिवारात तसेच ओढे-नाल्यांच्या परिसरात सहज आढळणारे गावरान जांभळाचे वृक्ष आता दुर्मिळ होत चालल्याचे चित्र दिसत आहे.

एकेकाळी ग्रामीण भागातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेले हे जांभूळ आता बाजारातही कमी प्रमाणात दिसू लागले आहे. त्यामुळे जुन्या पिढीकडून हळहळ व्यक्त केली जात असून नव्या पिढीला गावरान जांभळाची खरी चव अनुभवायलाही मिळत नसल्याचे बोलले जात आहे.

पूर्वी गावातील मुलांचा उन्हाळा म्हणजे जांभळाच्या झाडांवर चढून जांभुळे तोडण्याचा आनंद असायचा. शाळा सुटल्यानंतर मुले टोळक्याने जांभळाच्या झाडाखाली जमा होत असत. जांभुळे खाऊन जिभेला आलेला जांभळा रंग आणि खिशात भरून आणलेली जांभुळे ही ग्रामीण संस्कृतीची एक आठवण बनली होती. शेतकरीही शेतातील कामाच्या वेळी जांभळाच्या झाडाखाली विश्रांती घेत असत. मात्र आता ही दृश्ये हळूहळू इतिहासजमा होताना दिसत आहेत.

गेल्या काही वर्षांत वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड, रस्ते रुंदीकरण आणि शेतीच्या बदलत्या पद्धतींमुळे गावरान जांभळाची झाडे कमी झाली आहेत. पूर्वी नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या झाडांची काळजी घेतली जात होती; मात्र आता अनेक ठिकाणी जुनी झाडे तोडली जात असून नवीन झाडे लावण्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी गावोगावी दिसणारी मोठी, दाट जांभळाची झाडे आता क्वचितच पाहायला मिळतात.

सध्या बाजारात मिळणारी जांभुळे बहुतांश बाहेरून आणलेली किंवा व्यापारी पद्धतीने उत्पादित असतात. मात्र गावरान जांभळाचा नैसर्गिक गोडवा, आंबटपणा आणि सुगंध याची सर कोणत्याही इतर फळाला नसल्याचे नागरिक सांगतात. विशेष म्हणजे गावरान जांभळाचे वृक्ष पर्यावरणासाठीही महत्त्वाचे मानले जातात. पक्ष्यांना निवारा, जनावरांना सावली आणि परिसरातील तापमान संतुलित ठेवण्याचे काम ही झाडे करतात.

थंडावा देणारे फळ

गावरान जांभूळ हे केवळ चवीसाठी प्रसिद्ध नसून आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक मानले जाते. आयुर्वेदानुसार जांभूळ शरीराला थंडावा देणारे फळ असून मधुमेह नियंत्रणासाठी त्याच्या बियांचा उपयोग केला जातो. तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी, रक्तशुद्धीसाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी जांभूळ उपयुक्त मानले जाते. ग्रामीण भागात आजही अनेक घरांमध्ये जांभळाच्या बियांची पूड औषध म्हणून वापरली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT