We will not tolerate the farmers being cornered during a drought
भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः सध्याच्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच हवालदिल झालेल्या अन्नदात्या बळीराजाची कोणत्याही स्तरावर अडवणूक किंवा कोंडी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. बँकांनी तांत्रिक कारणांचे आणि कागदपत्रांचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना चकरा मारायला लावल्यास गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम पंचायती राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संतोष दानवे यांनी बँक प्रशासनाला दिला. तहसील कार्यालय, भोकरदन येथे शुक्रवार, दि. ६ रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना' भोकरदन-जाफराबाद क्षेत्रीय समिती, शेतकरी कर्जमाफी पुनर्रचना आणि नवीन पीक कर्ज वाटपाच्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांचा शेतमाल थेट मुख्य बाजारापर्यंत जलदगतीने पोहोचवता यावा आणि शिवारातील दळणवळण सुलभ व्हावे, यासाठी भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील ३६ शेत/पाणंद रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याची घोषणा या वेळी करण्यात आली. उर्वरित प्रस्तावित रस्त्यांचे प्रशासकीय सोपस्कार आणि कामांचा मार्गही युद्धपातळीवर मोकळा करण्यात येत असल्याचे आमदार दानवे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी कार्तिक पाणीग्रही, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर, 'मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजना' समितीचे सह-अध्यक्ष गणेश पाटील ठाले, उपजिल्हा निबंधक विष्णू रोडगे, गटविकास अधिकारी, श्रीकृष्ण वेणीकर, तालुका कृषी अधिकारी. अमोल शिंदे, समितीचे सदस्य सांडू वाघ, दत्तू पंडित, नाना भागिले, सुभाष देशमुख, डॉ. चंद्रकांत साबळे यांच्यासह तालुक्यातील सर्व राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक व संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बँकांनी संवेदनशीलतेने काम करावे
सध्याच्या गंभीर संकटात शेतकऱ्याला आर्थिक उभारी देणे ही प्रशासनाची प्राथमिकता असून "दुष्काळात शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा संवेदनशील काळात राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांनी संवेदनशीलतेने काम करणे अपेक्षित आहे. कागदपत्रांच्या त्रुटी काढून शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावणाऱ्या वृत्तीला लगाम घालावा. सर्व बँकांनी कोणतीही दिरंगाई न करता मोहिमेच्या स्वरूपात प्रत्येक पात्र शेतकऱ्याला तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश आमदार दानवे यांनी दिले.