भाजीपाला उत्पादकांवर भीषण पाणीटंचाईचे संकट pudhari photo
जालना

Jalna Agriculture News : भाजीपाला उत्पादकांवर भीषण पाणीटंचाईचे संकट

कोबीसह कोथिंंबीर व मेथीचे पीक पाण्याअभावी सुकू लागले, शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरातील कोबी, मेथी व कोथिंंबीर उत्पादक शेतकरी सध्या भीषण पाणीटंचाईमुळे अडचणीत सापडले आहेत. जून महिना अर्धा उलटूनही पावसाचे आगमन न झाल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसांत भाजीपाल्यांचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

पिंपळगाव येथे मंगळवारी मोठा आठवडी बाजार भरतो.या बाजारात भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने कोबी, कोथिंबीर, मेथी यांसारख्या भाजीपाला विक्रीसाठी आणतात. गतवर्षी चांगला पाऊस पडल्याने यंदा शेतकर्‍यांनी हजारो एकरांवर कोबीची लागवड करण्यात केली आहे मात्र, जून महिना अर्धा उलटूनही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.

परिणामी, सिंचनासाठी मुख्य आधार असलेल्या विहिरींनी तळ गाठला आहे. बोअरवेलमधील पाण्याची पातळीही झपाट्याने खालावली आहे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या कोबी पिकाला पाणी देणे शेतकऱ्यांना अत्यंत कठीण झाले आहे. पाण्याअभावी कोबीची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पीक करपू लागले असून ते वाळत आहे. ऐन काढणीच्या तोंडावर आलेले पीक डोळ्यादेखत वाया जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

शेतकर्‍यांचा बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर केलेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. शेतकरी बांधव पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. पाऊस लांबल्यास संपूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त कोबी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

दोन एकर क्षेत्रावर कोबी पिकाची लागवड केली आहे. परंतु पाण्याअभावी ते सुकून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. .
साहेबराव गाडेकर, शेतकरी पिंपळगाव रेणुकाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT