Water problem of 30 villages including the city resolved, Jui Dam filled
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : जुई मध्यम प्रकल्प लाभ क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाची पाणी पातळी ९० टक्क्यांवर पोहचली आहे. या धरणावर अवलंबून असलेल्या शहरासह ३० गावांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची सोय झाली आहे.
दरम्यान, भोकरदन तालुक्यातील जुई मध्यम प्रकल्पात पावसामुळे जलसाठा झपाट्याने वाढूत आहे. पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने धरण १०० टक्के भरून सांडव्यातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाखालील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते, असा सावधानतेचा इशारा पाटबंधारे खात्याने दिला आहे.
पाटबंधारे विभागाकडून दानापुर, वडशेद (जुने-नवे), ताडकळस, निंबोळा आणि बोरगाव या ग्रामपंचायतींना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सावध करण्याचे तसेच जनावरे, पाळीव प्राणी, वाहने व शेती अवजारे सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना करण्यात आले आहे. याबाबत दवंडी देऊन लोकांना जागरूक करावे, असेही सांगण्यात आले आहे.
पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यास नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नसल्याचेही सूचनापत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, वाढलेल्या साठ्यामुळे भोकरदन शहरासह तालुक्यातील जवळपास ३० गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न वर्षभरासाठी कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. यामुळे शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला असून पिकांना पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
धरण लाभक्षेत्रात आवक सुरूच
जुई धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे भोकरदन शहरासह तालुक्यातील जवळपास ३० गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. या आठवड्यात जिल्हाभरात जोरदार पाउस झाला आहे. यामुळे जुई धरणाच्या लाभक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणे आवक सुरू आहे. येत्या काही दिवसांत धरण ओव्हरफ्लो होण्याची चिन्हे निर्माण झाली असून, पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.