जालन्यात कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा file photo
जालना

जालन्यात कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा

कोट्यवधींचा कचरा प्रकल्प रामभरोसे; अमृत वन परिसरात कचरा संकलन केंद्रात साचले ढिगारे

पुढारी वृत्तसेवा

Waste management in Jalna is a mess

जालना, पुढारी वृत्तसेवा: स्वच्छ भारत अभियानांतर्गत जालना शहरासाठी मंजूर झालेला नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रशासकीय उदासीनतेमुळे अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही. यामुळे कचरा व्यवस्थापना प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जालना शहरापासून जवळच असलेल्या सामनगाव येथे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला प्रकल्प आजघडीला अत्यंत द्रवस्थेत आहे. किरकोळ दुरुस्तीअभावी सध्या बंद अवस्थेत आहे. येथे कचऱ्याचे वर्गिकरण होत नाही. शिवाय, कचऱ्याचे डोंगर साचल्याने जागाही अपुरी पडत आहे. यामुळे शहरातून निघणाऱ्या दररोजच्या १०० ते १२० टन कचऱ्याची विल्हेवाट लावायची कुठे? असा गंभीर पेच निर्माण झाला आहे.

शासनाने १२ एप्रिल २०१८ रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. मात्र, प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने कचऱ्याचे वर्गीकरण थांबले आहे. खत निर्मिती अडगळीत पडली आहे. येथे एक पोकलेन आणि जेसीबीची गरज असताना अजून पुरवण्यात आली नाही. परिणामी, कचरा टाकण्यासाठी बाट मोकळी करता येत नाही.

यामुळे कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. या प्रकल्पात कचरा साठवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने कचरा संकलन केंद्र अमृत वन शेजारी कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत. एकीकडे मनपा प्रशासनाकडून कचरा वर्गीकरणाचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे मुख्य प्रकल्पच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने वर्गीकरण प्रक्रियेचा फज्जा उडाला आहे. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही शहर स्वच्छतेचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच चिघळत चालला आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासन आता कोणती पावले उचलणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अमृत बनला कचऱ्याचा विळखा

महापालिकेचे कचरा संकलन केंद्र अमृत वनच्या शेजारी आहे. या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर साचले असून, परिसरात प्रचंड दर्गंधी पसरली आहे. सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले असून, त्यांचा जीव अक्षरशः गुदमरत आहे. निसर्गरम्य परिसराची कचराकुंडी झाली असतानाही प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT