Violation of rules; action taken against country liquor shop in Ashti
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : परतूर तालुक्यातील आष्टी येथील देशी दारू दुकानात नियमांचे उल्लंघटन केल्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. शिवाय, विभागीय गुन्हा दाखल करून जिल्हाधिकारी यांनी ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, परतूर तालुक्यातील आष्टी येथील देशी दारू दुकान क्रमांक ८२ मध्ये अधिकाऱ्यांनी तपासणी केली. या तपासणीत अनियमितता तसेच नियमांचे उल्लघन केल्याचे आढळून आले. या संदर्भात आष्टी येथील वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गणेश वैद्य यांनी आंदोलन केले होते.
दरम्यान, नियमाचे उल्लंघन करून आष्टी येथे रहदारी तसेच राज्य महामार्ग, शाळे जवळ सुरू असलेल्या देशी दारूच्या दुकानामुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहराध्यक्ष गणेश वैद्य यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या कडे केली होती. तक्रारीनुसार दुय्यम अधीक्षक जालना यांनी तक्रारदार गणेश वैद्य यांना एक पत्र पाठवले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अंबड येथील दुय्यम निरिक्षकांनी चौकशी करून सदरील दुकानाचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक यांच्याकडे सादर केला होता. अहवालानुसार जिल्हा अधीक्षक यांनी तक्रारीची शहानिशा करून सदरील दुकानाने अटी शर्थीचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने आष्टी येथील देशी दारू दुकान क्रमांक ८२ वर नियमभंग प्रकरण विभागीय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी ५० हजारांची दंडात्मक कारवाई केली असल्याचे नमूद केले आहे.