आन्वा ः भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात सध्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने किमतीत प्रचंड घसरण झाली आहे. कधी काळी सोन्याच्या भावाने विकला जाणारा भाजीपाला आता कवडीमोलाने विकावा लागत असल्याने उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
बाजारपेठेत भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. सध्या बाजारपेठेतील स्थिती अत्यंत विदारक आहे. शेतकऱ्यांना मेथीच्या चार जुड्या अवघ्या 10 रुपयांत, तर किलोभर वांगीही 10 रुपयांत विकावी लागत आहेत. कोथिंबिरीचे दर तर किलोला 10 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. व्यापाऱ्यांकडून मिळणारा हा दर वाहतूक खर्च आणि मजुरीसाठीही अपुरा पडत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी कोथिंबीर आणि मेथीच्या उभ्या पिकात जनावरे सोडणे पसंत केले आहे.
परिसरात पाणी मुबलक उपलब्ध असल्याने अनेक शेतकऱ्यांनी नगदी पिकाची आशा धरून मोठ्या कष्टाने भाजीपाल्याची लागवड केली होती. मात्र, उत्पादनासाठी घेतलेली मेहनत आणि केलेला खर्च याच्या तुलनेत बाजारपेठेत मिळणारी किंमत अत्यंत नगण्य आहे. शेतकरी जवळच्या आठवडी बाजारात स्वतः माल नेऊन विकण्याचा प्रयत्न करत आहेत, तरीही ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. सततचे नैसिगक संकट शेतकरी यांच्या पांचीला पूजलेले दिसून येत आहे.
दिलासा द्यावा
नगदी पिकातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल, ही शेतकऱ्यांची आशा आता धुळीस मिळाली आहे. बाजारपेठेतील ही दराची घसरण अशीच सुरू राहिली, तर शेतकरी कर्जबाजारी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन भाजीपाला उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.